जितेंद्र कालेकर
ठाणे : कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास संसर्गाच्या भीतीने त्याच्या अंत्यसंस्कारालाही जाताना नातेवाईकांना दहावेळा विचार करावा लागतो. त्यामुळे अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कारामध्ये बाधा येऊ नये, यासाठी ठाण्यातील शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी पुढाकार घेत दोघांवर अंत्यसंस्कार करुन माणुसकी जपली आहे.
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करता मृतदेह चांगल्या प्रकारे सील करतात. त्यानंतर नातेवाईकांपैकी एकाने लांबूनच त्याची ओळख पटविल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि मोजकेच कुटुंबीय त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात. परंतु मृताचे कुटुंबीयदेखील विलगीकरणातच असल्यामुळे अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील दिघा येथील एका ५0 वर्षीय कोरोनाबाधिताचा ५ मे रोजी रात्री ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण त्याचे कुटुंबीयदेखील विलगीकरणात होते. त्याच्या भावाने कोकाटे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अंत्यसंस्कारासाठी काही करता येईल का, अशी त्याने विचारणा केली. कोकाटे यांनी माणुसकीच्या दृष्टीने ठाणे महापालिका प्रशासनाची रितसर परवानगी घेत जवाहर बाग येथील गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्काराची प्रक्रीया पूर्ण केली. आरोग्य निरीक्षक अनिल जातड, मृताचा नातेवाईक म्हणून केवळ कोरोनाबाधिताचा भाऊ आणि काही पालिका कर्मचाऱ्यांनी कोकाटे यांच्या मदतीने ६ मे रोजी जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.महिलेचा अंत्यविधीदोन दिवसांपूर्वी हरिनिवास येथील ७0 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिचे सर्व नातलग क्वारंटाइन होते. तिची मुलगी रु ग्णालयात एकटी आली होती. तिला नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी अंत्यसंस्कारासाठी मोठी मदत केली.