मुंब्रा : कोरोना अहवाल येण्याआधीच कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याची आणखी एक घटना शनिवारी उघडकीस आली. या रुग्णालयांतील संबंधितांकडून मागील काही दिवसांपासून वारंवार घडलेल्या अशा चुकीमुळे त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत.
मुंब्य्रातील अमृतनगर भागातील ५२ वर्षीय व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. कोरोना आयसोलेशन विभागात उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील संबंधितांनी अहवालाची प्रतिक्षा न करता काही तासांमध्ये मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या दाखल्यात मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह घरी नेला. शनिवारी रात्री अमृतनगर दर्ग्याजवळील कब्रस्तानमध्ये विधिवत दफनविधी करण्यात आला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या विधीमध्ये शेकडो जण सामिल झाले होते. दफनविधीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृत व्यक्ती कोरोनाबाधित होती, अशी माहिती रविवारी मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला, त्याच्या कुटुंबातील सात जणांना तुर्तास क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आले आहे.
मृताच्या अंत्यदर्शनासाठी घरी आलेले, तसेच दफनविधीसाठी कब्रस्तानमध्ये गेलेल्यांपैकी बहुतांश जण या घटनेबाबत अनभिज्ञ असून ते कुटुंबांमध्ये तसेच परीसरात बिन्नदिक्कतपणे वावरत आहेत. त्यामुळे त्याना शोधायचे कसे, अशी समस्या आता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील लोकमान्यनगर परीसरात घडलेल्या अशाच घटनेनंतर कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याचे निर्दशनास आले होते.शनिवारी दफनविधीत जे सामील झाले होते, त्यांनी स्वत:हून कोरोनाची टेस्ट करण्यासाठी पुढे यावे. प्रशासनाने त्यांची टेस्ट मोफत करण्याची उपाययोजना करावी. ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह येईल, त्याच्यावर मुंब्य्रातीलच कोव्हिड १९ रुग्णालयात मोफत उपचार करण्यात यावेत. अहवाल येण्यापूर्वी ज्यांनी मृतदेह ताब्यात दिला, त्या रुग्णालयातील संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. - जफर नोमाणी, स्थानिक नगरसेवककोरोनामुळे कळवा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच अडचणीतठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी एका महिला वैद्यकीय अधिकाºयासह तिच्या दोन मुलींनाही बाधा झाल्याचे समोर आले. या रुग्णालयात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. या रुग्णालयातील एकेक करून आतापर्यंत चार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाची आरोग्य यंत्रणाच अडचणीत आली असून, या ढिसाळ कारभारानंतर डीनचे अधिकार काढून घेतले आहेत.
काही दिवसांपूर्वी एका वैद्यकीय कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आणखी एका महिला वैद्यकीय अधिकाºयाला लागण झाली. त्यानंतर आता तिच्या संपर्कात आलेल्या तिच्या दोन मुलींसह एका वैद्यकीय अधिकाºयाचाही रिपोर्ट पॉझिीटिव्ह आला आहे. तर त्यांच्या संपर्कातील इतर काही वैद्यकीय अधिकाºयांच्याही आता चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालय कोव्हीडसाठी सज्ज केल्यानंतर तेथील रुग्ण हे कळवा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. परंतु, या रुग्णालयातीलच अधिकारी आणि कर्मचाºयांनाच कोरोनाची लागण होत असल्याने संपूर्ण रुग्णालयच अडचणीत आले आहे.