अंबरनाथ : अंबरनाथमधील पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मुंबईतच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या चार कुटुंबीयांची आणि २० इतर नातेवाइकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, जवळच्या संपर्कातील चौघांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाली होती. या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्ताच्या पत्नी आणि मुलालाही रुग्णालयात दाखल केले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ११ दिवस उलटले तरी त्यांचे अहवाल न आल्याने ते दोघेही चिंतेत आहेत. अहवालच येत नसल्याने त्यांचे रुग्णालयातही हाल होत आहेत.अंबरनाथमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण हा बुवापाडा परिसरात सापडला. त्याच्या संपर्कातील चौघांची चाचणी केली. त्यापैकी पत्नी आणि मुलाला लागलीच सोडण्यात आले. दोन्ही पुतण्यांना रुग्णालयातच क्वारंटाइन केले. चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अहवालानंतर अंबरनाथ पालिकेने मृत झालेल्या कोरोनाग्रस्ताची पत्नी आणि मुलालाही तपासणीसाठी ठाण्याच्या रुग्णालयात पाठविले. त्यांची स्वॅब चाचणीही घेण्यात आली. ११ दिवस उलटले तरी अद्याप या दोघांचेही अहवाल आलेले नाही. त्यामुळे हे दोघेही चिंतेत आहेत. दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेले त्यांचेच दोन्ही नातेवाईक हे कोरोनावर उपचार घेऊन घरीही गेले.‘त्या’ सहा जणांचे अहवाल निगेटिव्हअंबरनाथमध्ये राहणारे व मुंबई महापालिकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा सदस्यांची कोरोना चाचणी केली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे संभाव्य धोका टळला आहे.अंबरनाथमध्ये एकच कोरोनाग्रस्तअंबरनाथमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले होते. एकाचा मृत्यू झाला असून, दोघे बरेही झाले आहेत. सध्या एकच रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे आजच्या घडीला अंबरनाथमध्ये कोरोनाचा एकच रुग्ण आहे.
CoronaVirus: कोरोनाचा अहवाल न आल्याने दोघे चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:39 AM