ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस चढउतार होत असताना, कोरोनाबाबत लोकांच्या मनात असलेली भीती काहीशी कमी होत आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात येत आहे. पुढील काही महिन्यांंत ती प्रत्यक्षात देण्यातही येणार आहे. याचा पहिला लाभ या लढ्यात सर्वात पुढे होऊन काम करणाऱ्या आरोग्य विभागातील योद्धयांंना मिळणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानुसार, आतापर्यंत जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी क्षेत्रातील ५५ हजार कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात मागील सात ते आठ महिन्यांत दोन लाख ३० हजार ७२२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी दोन लाख १७ हजार ६५४ जणांनी कोरोनावर यशस्वी मत केली आहे. या आजाराने पाच हजार ७१० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला सात हजार ३५८ जण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखल आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सप्टेंबरपर्यंत बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. ठाणे जिल्हावासीयांसाठी ही दिलासा देणारी बाब ठरत आहे. या आजारावर लस कधी येणार, हे अद्याप निश्चित नसले, तरी ती लवकरच येण्याचे संकेत आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत. ही लस आल्यानंतर पहिला मान आरोग्य कर्मचाऱ्यांचा असेल. त्यानंतर, नागरिकांनाही दिली जाणार असल्याचे समजते.