उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेने जिम, तरणतलाव, चित्रपटगृहे बंद केल्यानंतर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांनाही बंदी घातली आहे. नानानानी पार्क, मैदाने आणि सर्व उद्याने बंद करून मंगल कार्यालये तसेच टाउन हॉलमधील सर्वच कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत रद्द केल्याचे परिपत्रक पालिकेने काढल्याने विवाह सोहळ्यांवरही गदा आली आहे. मात्र, आयुक्तांच्या परवानगीने विवाह सोहळ्यांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशान्वये सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने उल्हासनगरातील ४५ जिमसह सहा चित्रपटगृहे आणि तरणतलाव बंद केले. सोमवारी आयुक्तांनी पुन्हा परिपत्रक काढून वरिष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, उद्याने आणि मैदाने बंद करून खाजगी, सामाजिक, राजकीय तथा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली. पालिका टाउन हॉल आणि खाजगी मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यांवरही या परिपत्रकामुळे संक्रांत आली आहे. मात्र, आयुक्तांच्या परवानगीने लग्न सोहळे पार पाडण्याची शक्यता आहे.आयुक्त स्वत: सोशल मीडियावर सक्रिय असून एकूणच परिस्थितीवर प्रत्यक्ष लक्ष ठेवून आहेत. यासर्व प्रकाराने प्रथमच शहरात शुकशुकाट पसरला असून आर्थिक व्यवहारही ठप्प पडले आहेत. शाळा, कॉलेज बंद ठेवल्याने परिसरात शांतता पसरून शिक्षक कामे करताना दिसत आहेत.नाका कामगारांवर उपासमारीची वेळकोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बांधकामे बंद पडल्याने नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली. नाक्यांवर दुपारपर्यंत थांबूनही कोणीही काम देण्यास येत नसल्याने, कामाविना घरी जावे लागत असल्याचे नाका कामगारांनी सांगितले. शासनाने शेतकरी व इतरांप्रमाणे आम्हालाही मदत केल्यास उपासमारीची वेळ येणार नसल्याचे ते म्हणाले.
Coronavirus : विवाह सोहळ्यांसाठी लागणार आयुक्तांची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 3:27 AM