ठाणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही हॉटस्पॉटच पूर्णपणे बंद करून चालणार नाही. यामुळे त्या भागातील नागरिक इतर भागात जाऊन, त्या भागाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते, अशी शंका निर्माण झाल्यानंतर १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने सोमवारी घेतला होता. त्यानुसार, या काळात शहरात केवळ दूध व मेडिकल दुकानांसह दवाखानेच सुरू राहणार असून उर्वरित सर्वच व्यवहार बंद राहणार होते. मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असताना पुन्हा कठोर निर्बंध कशासाठी, असा प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केल्यानंतर लॉकडाऊनच्या स्वरुपाबाबत संभ्रम झाला आहे.
काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आजघडीला शहरात आठ हजाराहून अधिक रुग्ण असून, २७७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून त्यात वाढ होत आहे. झोपडपट्टीपाठोपाठ सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगरसह इतर भागात रुग्ण वाढत आहेत. यामुळे सुरुवातीला ज्या भागात रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करून तेच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस होती. त्यानुसार, २२ विभागदेखील निश्चित करून तेथील हॉटस्पॉटही निश्चित केले होते.
दरम्यान, सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करून चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. त्याऐवजी संपूर्ण ठाणे शहर बंद करावे, यावर या बैठकीत एकमत झाले. त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर महापालिका आयुक्तांची बैठक पार पडली. तीत संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर एकमत झाले. मात्र, लॉकडाऊनदरम्यान लोकांची गैरसोय व्हायला नको. किराणा दुकान, भाजीपाला विक्री आदींवर प्रतिबंध न आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सायंकाळी केल्या. त्यामुळे आता लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी तरी कशी, असा पेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे.अंबरनाथमध्ये लॉकडाऊनला मुदतवाढअंबरनाथ : शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अंबरनाथ नगरपालिकेने आधीच ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, आता हा लॉकडाऊन ६ जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने याआधीच सात दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याची मुदत ३० जूनला संपणार होती.
या लॉकडाऊनमध्ये शहरातील दवाखाने आणि औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, भाजी आणि फळविक्री हे घरपोच सेवा देणाºयांसाठी सुरू ठेवण्यात आले होते. आता या लॉकडाऊनमध्ये पुन्हा सात दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे १ ते ६ जुलैदरम्यानदेखील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिले आहेत.शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात. शहरात सर्वच भागात लॉकडाऊन करणे अवघड होणार आहे. त्यामुळे सध्यातरी लॉकडाऊनचा निर्णय केवळ विचाराधीन आहे. मग अंशत: किंवा पूर्णपणे लॉकडाऊन करायचे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कंटेनमेंट झोन आणि रुग्णसंख्या मोठी असलेल्या भागांमध्ये कडक निर्बंध राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे बंधनकारक राहणार आहे. - विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर