विशाल हळदे
ठाणे - कोरोनामुळे महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे. या संकटातून मार्ग काढत ठाण्यातील आंबेडकर रोडवर राहाणाऱ्या ६९ वर्षीय सिंधुताई चाफेकर यांनी यांनी त्यांना दरमहा मिळणाऱ्या पेन्शनमधील काही रक्कम मुख्यमंत्री निधीमध्ये गुरुवारी जमा केली. सिंधुताई आपल्या पतीसह ठाण्याच्या आंबेडकर रोडवरील धेंडे चाळीतील पहिल्या मजल्यावर राहतात.
ठाण्याच्या मनोरुग्णालयात ३९ वर्ष त्या अटेण्डन्ट म्हणून कार्यरत होत्या. गेल्या १७ वर्षापासून त्यांना दरमहा १४५०० रुपये पेन्शन मिळत आहे. या पेन्शनमधील दहा हज़ार रुपये त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांच्याच वॉर्डाचे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्याकडे सुपूर्द केले. कालच मुख्यमंत्र्यानी त्यांच्या सहायता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. ते पाहून मी नगरसेवक सुधीर कोकाटे यांना त्यांच्या कार्यालयाजवळ भेटायला गेले . त्यांच्याकडे १० हजार रुपयांची रोख रक्कम दिली.
सुधीर कोकाटे यांनी ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामधील मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यामध्ये जमा केली. सिंधुताई यांचे घर फार छोटे आहे आणि गळके आहे. घरात पती आणि त्या स्वतः राहतात. मुलबाळ नाही, पती कुठेहि सर्व्हिसला नव्हते. उरलेल्या पैशात आम्ही एक वेळचे जेवण करू. कोरोनामुळे शहरात आणि इतर ठिकाणी अडकलेल्या लोकांना माझ्या मदतीतून एक वेळचे तरी जेवण मिळेल. शासन आम्हाला इतकी वर्षे पोसत आहे. अशा बिकट परिस्थितीत पुढे येणे हे आपले हि कर्तव्य आहे असे मत सिंधुताई यांनी लोकमतकडे व्यक्त केले.