ठाणे : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातच राहण्याचे आवाहन करून रात्रंदिवस तैनात असलेल्या पोलिसांना डाँक्टर, नर्सेस, सफाई कामगार यांना आपल्या घरातील समजून सहकार्य करा. संकट काळात सहकार्य करण्याची आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आहे. ती कायम राखत जाग, देश आणि स्वत: निरोगी जीवन जगण्यासाठी घरात राहून कोरोनाच्या या संकटावर मात करण्याचे आवाहन सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केले. कल्याण परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि पार्थ पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी वाहनातून सकाळ, संध्याकाळ अन्न वाटप करण्यात येत आहे. त्या प्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांशी हिंदुराव यांनी संवाद साधला. सहकार्य, परंपरेच्या दृष्टीने संस्कृती, परंपरा जपण्याचे कार्य आपल्या देशाने आणि महाराष्ट्राने चीन - जपानमधील दुसर्या महायुद्धाच्या काळात केल्याचे त्यांनी सांगितले. या युद्धाच्या वेळी चीनला आपण तज्ज्ञ डाँक्टरांचे वैद्यकीय पथक पाठवले होते, त्याचे उत्तम नेतृत्व आपल्या महाराष्ट्रातील सोलापूरचे डाँ द्वारकानाथ कोटणीस यांनी करुन आपली संस्कृती, सहकार्याच्या परंपरेचे दर्शन घडवल्याची आठवण ही हिंदुराव यांनी या आवाहना प्रसंगी नागरीकांना करुन दिली आहे. पंतप्रधान, मुख्यमंंत्री, उपमुख्यमंत्री आणि देशाचे नेते शरद पवार यांनी युट्यूबवर केलेल्या आवाहनास अनुसरुन या काळात घरात राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले .
coronavirus : डॉक्टर, पोलिसांना घरातील समजून सहकार्य करा - प्रमोद हिंदुराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 4:29 PM