ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी ठाण्यातील सर्वेश कारखानीस कोरोनाग्रस्त देशांतील इनोव्हेटर्ससोबत तंत्रज्ञानाद्वारे समन्वय साधत आहे. हे इनोव्हेटर्स ओपन सोर्स व्हेंटिलेटर, थ्रीडी प्रिंटेड मास्क व फेस शिल्ड, पीपीइ सूट, पीसीआर मशीन अशा प्रकल्पांवर काम करत आहेत. सर्वेश त्यांना प्रकल्पासंबंधी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय मार्गदर्शन करत आहे. तसेच तो आर्टिफिशयल इंटेलिजन्सद्वारे एक्स-रे वापरून कोरोनाचे निदान करण्याच्या अॅपवर काम करत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विशेष प्रावीण्य असणाऱ्यांची मदत मोलाची ठरत आहे. हे इनोव्हेटर स्वत: तंत्रज्ञान विकसित करतात. त्यामुळे त्यांना मेकर्स म्हणूनही संबोधले जाते. जगभरात या इनोव्हेटर्सची मेकर मूव्हमेंट आहे. त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची प्रदर्शने विविध विद्यापीठांमध्ये भरवली जातात. अशा इनोव्हेटर्स-मेकर्सपैकी सर्वेश एक आहे.
सर्वेशला नुकताच मॅसॅचुसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेकनॉलॉजीच्या (एम.आय.टी) कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबोरेटरीकडून त्याच्या वैद्यकीय उपकरणांसंबंधी प्रकल्पासाठी पुरस्कार मिळाला. त्यावेळेस मेकर मूव्हमेंटच्या संस्थापकांपैकी एक असलेले हार्वर्ड-एमआयटीचे ज्येष्ठ संगणतज्ज्ञ डॉ. सिंथीया सोलोमन यांच्याकडूनही त्याला कौतुकाची थाप मिळाली. कोरोनावर मात करण्यासाठी जगातील इनोव्हेटरना काही करता येईल का, याबाबत सर्वेशने विचार सुरू केला. त्यासाठी त्याने इनोव्हेटर्स-मेकर्ससाठी फेसबुकवर कोविड -१९ : मेकर्स कोलॅब्रॅटिव्ह हा ग्रुप सुरू केला. त्यात विविध ९० पेक्षा अधिक देशांमधील दोन हजारांहून अधिक इनोव्हेटर्स आहेत.
अमेरिकेतील शिकागो, बोस्टन, वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क आदी शहरांत वेगाने वाढणाºया रुग्णांमुळे अलीकडेच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळेस तेथील स्वयंसेवक व डॉक्टरांमध्ये समन्वय साधण्याचे काम सर्वेशने केले. मेकर्समधील स्वयंसेवकांनी हजारो पीपीई कीट्स स्वत: बनवून जगभरात विविध ठिकाणी डॉक्टर व रुग्णालयांना पुरवले आहेत. त्यासाठी ते आपल्याकडील थ्री डी प्रिंटर्स, सीएनसी मशीन, कॅड, आर्डुईनो मायक्रो कंट्रोलरचा वापर करत आहेत.
केवळ एकट्या स्वयंसेवकापर्यंत काम मर्यादित न राहता सर्वेशने त्यात लहान उद्योगधंदे व स्टार्टअपनाही सहभागी करून घेतले आहे. त्यात त्याने न्यूयार्कमधील काही स्टार्टअप एक्सेलरेटर आणि गुंतवणूकदारांना जोडून घेतले. कोविडसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या स्टार्टअपच्या काही स्पर्धांमध्ये सर्वेशने परीक्षकपदही भूषवले. सर्वेशच्या कल्पनेनुसार न्यूयॉर्कमध्ये वैद्यकीय सामग्री पुरवणाºया स्टार्टअपसचा ग्रुपही तयार झाला आहे. डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या एका ई-मेलने त्यांना ती सामग्री उपलब्ध होते. भारतातही अशीच संघटना सुरू करण्याचा सर्वेश प्रयत्न करत आहे.
कोरोनाचे संकट नवीन असल्यामुळे सतत नवीन माहिती पुढे येत आहे तसेच काही जुनी माहिती चुकीची ठरत आहे. इटली, अमेरिका आणि भारतातील डॉक्टर व संशोधकांकडून मिळालेल्या माहितीचे संकलन करून त्यानुसार आवश्यक ती मदत आणि बदल करण्याच्या सूचना सर्वेश इनोव्हेटर्सना करत आहे.संसदीय उच्चपदस्थांनी घेतली दखलसर्वेशच्या कोरोनासंबंधी कार्याची दखल सोशल मीडियाद्वारे भारतातील संसदीय उच्चपदस्थांनीही घेतली आहे. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे काही सहकारी फेसबुकद्वारे सर्वेशच्या संपर्कात आले. सर्वेशचा त्यांनी सहस्रबुद्धे यांच्याबरोबर संपर्क घडवून आणला.