- अजित मांडकेठाणे - मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ठाणे शहरात १,१९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ७० वयोगटांपेक्षा जास्त असलेल्या ३८४ वृद्धांचा झाला आहे. याखालोखाल ६० ते ७० वयोगटातील ३४० जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक दिसला आहे. आजही हा धोका कायम असल्याने ज्येष्ठांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत सात लाख आठ हजार ६०० कोरोना चाचण्या झाल्या असून त्यात ५२ हजार ९४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून ५० हजार २९४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार ४४७ एवढी आहे. तर एक हजार १९९ जणांचा मृत्यू झाला आहे. मार्चमध्ये कोरोनाची लाट आल्यापासून आतापर्यंत झालेल्या या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू हे वयोवृद्धांचे झाले आहेत. परंतु, काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आजही काही कामानिमित्त किंवा घरात बसायला कंटाळा आला म्हणून बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. एप्रिलमध्ये १७ तर मे मध्ये १६०, जूनमध्ये ३११, जुलैमध्ये २५५ जणांचे मृत्यू झाले होते. तर नोव्हेंबर महिन्यात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्युदर हा २.२८ टक्के एवढा आहे. दरम्यान, मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिका विविध उपाय करीत आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरात माेठ्या संख्येने काेराेनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनापुढे यावर ताेडगा कसा काढायचा असा प्रश्न उभा हाेता.
Coronavirus : ठाण्यात कोरोनाच्या महामारीमध्ये वयोवृद्धांचे झाले सर्वाधिक मृत्यू, सत्तरीतील ज्येष्ठांना धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 8:53 AM