अजित मांडके ठाणे : ठाणे महापालिकेच्या सर्वच प्रभाग समित्यांमधील झोपडपट्टीत कोरोनाने आपले हातपाय पसरल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. कळवा, मुंब्रा, वागळे, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, उथळसर आदींसह इतर सर्वच प्रभाग समित्यांत त्याने गुणाकाराने शिरकाव केला आहे. यामुळे ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या २०० पार झाली आहे. झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात असल्याने आणि काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे तसेच महापालिका प्रशासनाच्या चुकांमुळेच त्याने ठाणेकरांचे जगणे हराम केले असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.देशात २१ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले होते. परंतु, असे असतानाही अनेक नागरिक भाजीखरेदीसाठी, मेडिकलमध्ये जाण्यासाठी या ना त्या कारणासाठी बाहेर पडत आहेत. यामुळे महापालिकेने मार्केट बंद केले. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. उलट झोपडपट्टी भागातील गर्दी काही कमी झालेली नाही. सोसायट्यांमध्ये मास्क, सॅनिटायझर वापरले जात असताना झोपडपट्टी भागात मात्र ते वापर न करताच नागरिक घराबाहेर पडत असूून महापालिकेने कडक नियम करूनही त्यालाही हरताळ फासला गेला आहे. येथील बाजारांमध्ये गर्दी होत आहे. या नागरिकांना पोलिसांचीही भीती नाही. नाक्यानाक्यांवर जथ्थे करून काही मंडळी आजही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासत आहे. त्यामुळेच आता कोरोनाने जोरदारपणे झोपडपट्टी भागात शिरकाव केला आहे.>अशी आहे सध्याची कोरोनाग्रस्तांची संख्यामुंब्य्रात कोरोनाचे ४० हून अधिक रुग्ण आहेत. यामध्ये पोलीसही आहेत. तर, कळव्यात कोरोनाचे 27 हून अधिक रुग्ण, कोपरीत सातहून अधिक रुग्ण सापडले आहे. कोपरीत तर ग्रीन झोन घोषित केला होता. येथील दोन्ही बाजूकडील सीमादेखील बंद केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वागळे इस्टेट प्रभाग समितीत आता रोज तीन ते पाच नव्या रुग्णांची भर पडत आहे. तिकडे उथळसरमध्ये राबोडी कोरोनापासून दूर होते. मात्र, तेथेही कोरोनाने शिरकाव केला असून उथळसर प्रभाग समितीत २७ हून अधिक रुग्ण गेल्या चार ते पाच दिवसांत वाढले आहेत. लोकमान्य-सावरकरनगर भागात तर आठवडाभर विशेष लॉकडाउन घेऊनही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे आणि महापालिकेने केलेल्या एका चुकीमुळे येथील रुग्णांची संख्या 25 हून अधिक झाली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील झोपडपट्टीतही आता कोरोनाने शिरकाव करून २० हून अधिक जणांना बाधित केले आहे. वर्तकनगरमध्येही 20 हून अधिक, नौपाडा भागातही ही संख्या वाढताना दिसत आहे. आता तर दिवा प्रभाग समितीमध्येही कोरोनाने शिरकाव करून नागरिकांची झोप उडविली आहे. या भागात तर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पुरता हरताळ फासला आहे. तिकडे माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील मानपाडा गावातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे एकूणच सोसायट्यांमध्ये एकेक रुग्ण असलेली संख्या झोपडपट्टीत मात्र गुणाकाराने वाढत आहे.
CoronaVirus : झोपडपट्टीत वाढतोय कोरोना, महापालिका प्रशासनाची वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:48 AM