अंबरनाथ: अंबरनाथ बुवापाडा भागात गेल्या आठवड्यातच एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या नातेवाईकांची तपासणी करण्यात आली होती. जवळील नातेवाईकांपैकी पत्नी आणि मुलाला त्याचा संसर्ग झाला नाही हे समोर आले होते. मात्र त्या मृत व्यक्तीच्या इतर दोन नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील बुवापाडा भागात एका 50 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर लागलीच वैद्यकीय पथकाने त्याच्या जवळील नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात त्या मृत व्यक्तीच्या पत्नीचे आणि मुलाचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. तर इतर नातेवाईकांना रुग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. त्याच नातेवाईकांपैकी दोघांचे रिपोर्ट आता कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.बुवापाडा येथे ज्या इसमाला कोरोनाची पहिली लागण झाली होती ती व्यक्ती उत्तर प्रदेशमधून आपल्या गावी जाऊन आली होती. मात्र त्याला इतर त्रास जाणवल्याने तो सुरुवातीला अंबरनाथच्या रुग्णालयात आणि नंतर मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल होता. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्याला लागलीच भाभा रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू झाल्यावर लागलीच त्याचा मृत्यू देखील झाला.या प्रकारानंतर अंबरनाथच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी केली होती, त्यात मुलाला आणि पत्नीला कोरोनाची लागण झाली नव्हती. त्यामुळे घरातील कुटुंबासहित इतर नातेवाईकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. सुदैवाने कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण हे ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल आहेत.
Coronavirus : अंबरनाथमध्ये कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या घरातील दोघांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 4:35 PM