सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोना पोझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या अंबरनाथ येथील एका रुग्णामुळे मध्यवर्ती रुग्णालयात शनिवारी गोंधळ उडाला. दरम्यान अंबरनाथ व उल्हासनगरातील कोविड रुग्णालयमध्ये रुग्णाला घेण्यास टोलवाटोलवी करीत असल्याने गोंधळात भर पडली. अखेर समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सर्वत्र फोनाफोनी केल्यानंतर कोरोना संसर्गित रुग्णाला रात्री उशिरा कोविड रुग्णालयात हलविल्याने डॉक्टर, नर्स, कर्मचारी व इतर रुग्णांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यासह इतर रुग्ण उपचारासाठी येत असलेल्या संशयित कोरोना रुग्णामुळे दहशती खाली आले. शनिवारी अंबरनाथ येथून आलेल्या एका रुग्णावर मध्यवर्ती रुग्णालयातील सामान्य वार्डात उपचार सुरु होते. मात्र दुपारी रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने डॉक्टर, नर्स यांच्यासह कर्मचारी व वार्डात उपचार घेत असलेले रुग्णात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
रुग्णालयाचे निवासी अधिकारी जाफर तडवी यांनी उल्हासनगर व अंबरनाथ येथील कोविड रुग्णालयाला फोन करून रुग्णा विषयी माहिती दिली. तसेच कोरोना संसर्गित रुग्णाला त्वरित घेऊन जाण्याची विनंती करून रुग्णालयातील बदलत्या वातावरणाची माहिती दिली. मात्र दोन्ही कडून रात्री उशिरा पर्यंत टोलवाटोलवी चालली. अखेर निवासी वैद्यकीय अधिकारी तडवी यांनी रुग्णालयातील वातावरण बघून एका पत्रकाराला सदर माहिती दिल्यावर लगेच चक्र फिरली.
समाजसेवक शिवाजी रगडे यांनी याबाबत पुढाकार घेऊन संसर्गित कोरोना रुग्णामुळे इतरांना संसर्ग झाल्यास जबाबदार तुम्ही राहणार. असा दम कोविड रुग्णालयातील डॉक्टर व संबंधितांना भरल्यावर रात्री साडे नऊ वाजता संसर्गित कोरोना रुग्णाला कोविड रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याप्रकाराने संक्रमित रुग्णासह मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णासह डॉक्टर, नर्स. कर्मचाऱ्यांना हायसे वाटले.
मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर येथील शेकडो रुग्णावर उपचार होत असून महिन्याला ५०० पेक्षा जास्त लहान मुलांचा जन्म होतो. तसेच नियमित डायलेसिस प्रकिया सुरु असून ज्या मुलांच्या अंगात रक्त तयार होत नाही. अशा १२० लहान मुलांना नियमितपणे रक्त दिले जाते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असताना रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये ६०० पेक्षा जास्त रुग्णाची नोंद होते. असी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जाफर तडवी यांनी दिली. मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५ पेक्षा जास्त रुग्ण पोझिटीव्ह आले असून त्यांच्या संपर्कात आलेले ३ वैद्यकीय अधिकारी, ८ कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तडवी यांनी दिली. याप्रकाराने रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचार्यासह इतर रुग्ण भीतीच्या छायेखाली आले आहे, महापालिकेने संशयित कोरोना रुग्णासाठी वेगळे रुग्णालय उघडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.