- अनिकेत घमंडीडोंबिवली - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये तब्बल ४५ लाख प्रवाशांकरिता १३५० तिकीट तपासनीस (टीसी) कार्यरत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा संचार रोखण्याकरिता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर कोणता प्रवासी तिकीट काढून फिरतोय व कोण फुकट्या फिरतोय, यावर नियंत्रण ठेवणे टीसींना अशक्य आहे. त्यातच कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याकरिता टीसींना रेल्वेने मास्क, सॅनिटायझर वगैरे कुठल्याच गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने विषाची परीक्षा कोण पाहणार, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.टीसींना गर्दीत उभे राहून, रेल्वेगाड्यांमध्ये जाऊन प्रवाशांचे तिकीट तपासावे लागते. मात्र, कोरोनासंदर्भातील घ्यावयाच्या काळजीबाबत टीसींना रेल्वे प्रशासनाने कोणतीही सूचना केलेली नाही किंवा साधने पुरवलेली नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टीसीने प्रतिदिन पाच पावत्या फाडणे अपेक्षित असतानाही त्यांना दिवसाला २५ ते ३० पावत्या फाडण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. कोरोनाची साथ असताना प्रवाशांच्या गर्दीमध्ये जाऊन फुकट्यांना लगाम लावताना त्यांना मास्क, सॅनिटायझर वगैरे सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे टीसींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. फुकट्या प्रवाशांकडून दंड रोख स्वरूपात स्वीकारणे बंधनकारक असल्याने धोका जास्त आहे. नोटांच्या माध्यमातून व्हायरस अधिक लवकर पसरू शकतो.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत सीएसएमटी ते लोणावळा, इगतपुरी तसेच भिवंडी, रोहा एवढा परिसर येतो. त्यामध्ये सुमारे १३५० टीसी कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे ५०० टीसी हे विविध ठिकाणी रेल्वेस्थानकांवर कार्यरत आहेत. २५० हे स्पेशल स्क्वॉडअंतर्गत कार्यरत असतात, तर अन्य सुमारे ६०० टीसी हे लांब पल्ल्यांच्या तसेच लोकलमध्ये कार्यरत असतात. पण, यापैकी कोणालाही कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Coronavirus : मध्य रेल्वेच्या १३५० टीसींना ‘कोरोना’चा धोका?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:55 AM