कल्याण : कल्याण-डोंबिवलीत वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेतील महापालिकेने अधिग्रहित केलेल्या होलिक्रास कोविड रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप गटनेते शैलेश धात्रक आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, रुग्ण संख्या वाढत असताना येथे आॅक्सिजन बेड आणि आयसीयूची कमतरता आहे. तसेच व्हेंटिलेटरही कमी आहेत. आयसीयू बेडचे फोर्टीज रुग्णालय आयुक्त टेकओव्हर करणार आहेत. त्याचबरोबर आॅक्सिजन व आयसीयू बेडची संख्या वाढवण्याचे नियोजन आयुक्तांनी केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जाणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांच्या चाचण्या तातडीने घेतल्या पाहिजेत. त्यांचे रिपोर्ट हे तीन दिवसांनी मिळतात. इतका कालावधी लागण्याचे कारण नाही. या कालावधीत पॉझिटिव्ह रुग्णाकडून अन्य रुग्णांना लागण होऊ शकते. २४ तासांच्या आत प्रशासकीय यंत्रणा व रुग्णाला त्याचा अहवाल मिळाला पाहिजे.महापालिकेकडे कोविड लढ्यासाठी आरोग्य कर्मचारी कमी आहेत. राज्य सरकारने आरोग्य कर्मचारी महापालिकेस दिले पाहिजेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोरोनावर मात करण्यासाठी तोकडी असल्याने राज्य सरकारने कल्याण-डोंबिवलीची गंभीर दखल घेऊन त्यात लक्ष घातले पाहिजे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.भाजपला आंदोलनाचा विसर२३ जुलै रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही कोरोनाचा आढावा घेतला होता. तेव्हा आरोग्य यंत्रणा थिटी असल्याचे भाष्य करून दहा दिवसाची डेडलाइन आयुक्तांना दिली होती. या कालावधीत स्थिती सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचा भाजपला विसर पडल्याचे आजच्या भेटी दरम्यान दिसून आले.‘महागड्या गाड्यांपेक्षा आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यावे’भिवंडी : राज्य सरकारने महागड्या गाड्या खरेदीपेक्षा पोलिसांचे वेतन, आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असा चिमटा फडणवीस यांना रविवारी ठाकरे सरकारला काढला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी येथील इंदिरा गांधी कोविड रुग्णालयाला भेट देत येथील व्यवस्थेची माहिती घेतली.
coronavirus: कोरोनामुळे कल्याण-डोंबिवलीतील परिस्थिती गंभीर - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:22 AM