जान्हवी मोर्ये
डोंबिवली : लॉकडाउनमुळे मूर्तीकारांना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल सध्या मिळत नाही. वेळेत हा माल न मिळाल्यास यंदा गणेशोत्सवात मूर्ती वेळेत देणे अवघड होईल, अशी शक्यता मूर्तीकार सेवा संस्थेने व्यक्त केली आहे. संस्थेचे सरचिटणीस नरेश कुंभार यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्र्यांना टष्ट्वीट केले आहे.
कुंभार म्हणाले, प्लेगची साथ शंभर वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळीही मूर्ती तयार झाल्या नव्हत्या. तेव्हा गणेशभक्तांनी मूर्तीऐवजी प्रतिमेचे पूजन केले होते. प्लेग प्रमाणेच आता कोरोनाचे संकट ओढावले आहे. सरकारने मूर्तीकारांच्या प्रश्नांबाबत लवकर योग्य तो निर्णय घ्यावा. मूर्तीकारांना कच्चा माल उपलब्ध करून द्यावा. पीओपी मूर्ती तयार केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे मूर्तीकार धास्तावले आहेत. कोणती मूर्ती तयार करायची याबाबत संभ्रम आहे.
मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल गुजरात, दिल्ली, मुंबई, केरळ येथून येतो. गुजरातहून येणारी मातीची एक गाडी परत पाठविली गेली. मूर्तिकारांच्या हाताला काम नसल्याने ते सध्या भाजी विकत आहेत. दुसरीकडे कोरोनामुळे मूर्तीच्या किमतीत वाढ करता येणार नाही. मात्र, कच्चा माल येत नसल्याने मालविक्रेते मूर्तीकारांकडून जास्तीचा दाम घेतील, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.कुंभार पुढे म्हणाले, मूर्तीकार सेवा संस्थेशी जोडलेले ३७ मूर्तीकार ३०० मूर्ती घडवितात. मातीच्या दोन व पीओपीच्या १० मूर्ती एका दिवसाला तयार करता येतात. दरम्यान, मूर्तीकारांना कच्चा माल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनीही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.चीनहून माल कसा घेता येणार?
- गणेशभक्तांमध्ये डायमंड मूर्तीची क्रेझ आहे. त्यासाठी लागणारा माल चीनहून येतो. यंदा कोरोनामुळे चीनकडून हा माल घेता येणार नाही. त्यामुळे या मूर्तीही तयार करता येणार नाहीत.
- गुढीपाडव्यापासून मूर्तीचे बुकिंग सुरू होते. पण यंदा त्याला ब्रेक लागला आहे, असेही कुंभार म्हणाले.
- कोरोना व लॉकडाउनमुळे मूर्तिकार अडचणीत आले असून यातून कसा मार्ग काढायचा, याची चिंता लागली आहे.