उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयाचा आदेश धुडकावून संशयित कोरोना रुग्णाच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांपैकी ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. खन्ना कम्पाउंड येथील एकाचा गेल्या शनिवारी मध्यवर्ती रुग्णालयात मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला कोरोना संशयित म्हणून जाहीर केले होते. मृतदेह उघडू नका, या अटीवर तो कुटुंबाच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी दिला होता. मात्र कुटुंबीयांनी मृतदेह घरी नेऊन उघडून अंत्ययात्रा काढली. दुसऱ्या दिवशी मृत झालेल्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुटुंबासह अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ७० पेक्षा अधिक नागरिकांना क्वारंटाइन केले. शुक्रवारी त्यांच्या स्वॅब अहवालात ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. महापालिकेने खन्ना कम्पाउंड परिसर सील केला आहे. दरम्यान, असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. सेंच्युरी रुग्णालयात एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने कुटुंबाच्या ताब्यात मृतदेह देताना तो उघडू नका. अंत्ययात्रा काढू नका, असे सुचविले होते. मात्र या रुग्णाची अंत्ययात्रा काढल्याचे बोलले जाते.
coronavirus: अंत्ययात्रेत ९ जणांना कोरोनाची बाधा; उल्हासनगरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 6:31 AM