प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : कोरोनामुळे अनेक वागदत्त वधूवरांना विवाह पुढे ढकलावे लागले; परंतु ठाण्यातील संघवी आणि बाफना कुटुंबाने त्यांच्या मुलांचे शुभमंगल ठरलेल्या तारखेला घरातच उरकले. त्यानुसार ठाण्याचा वर आणि मुंबईच्या वधूचा घरगुती विवाहसोहळा नुकताच झाला. या घरगुती सोहळ्यादरम्यान वरवधूंनीही मास्क घातले होते.
ठाण्याचा राज संघवी आणि वृषाली बाफना यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांनी २ मे २0२0 ही लग्नाची तारीख निश्चित केली होती. त्यांचे लग्न खोपोली येथे डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने करण्याचे योजिले होते. नातेवाइकांना व्हॉट्सअॅपद्वारे आमंत्रणही देण्यात आले; परंतु दरम्यानच्या काळात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. लॉकडाउनचा कालावधी वाढतच गेल्याने नातेवाइकांनी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता; पण दोन्ही कुटुंबांनी घरातच विवाहसोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला, असे राजचे वडील महेंद्र संघवी यांनी सांगितले. ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर महेंद्र यांनी पोलिसांना आॅनलाइन अर्ज केला असता, तीन लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली.
लग्नाचे कपडे नसल्याने घरात उपलब्ध असलेल्या कपड्यातच राज, त्याचे वडील आणि आई सोबत निघाले. बाफना कुटुंबातील वृषाली, तिचे आई-वडील असे तीन, संघवी कुटुंबातील तीन आणि एक भटजी अशा केवळ सात जणांच्या उपस्थितीत मुंबईतील बाफना कुटुंबाच्या राहत्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे, घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद या नववधूवरांनी व्हिडीओ कॉलद्वारे घेतले.लग्न साध्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव व्याहींसमोर मी आधीच ठेवला होता; पण त्यांना धामधुमीत करायचे होते. शेवटी कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच करावे लागले. माझ्या दुसऱ्या मुलाचे लग्नही मी अशाच पद्धतीने करणार असल्याचे महेंद्र यांनी संघवी सांगितले. सोसायटीतील रहिवाशांनी थाळी वाजवून नवदाम्पत्याचे स्वागत केले.