भाईंदर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह जाळू देण्यास भार्इंदर पश्चिमेच्या स्मशानभूमी परिसरातील रहिवाशांनी सोमवारी मध्यरात्री विरोध केला. अखेर पोलिसांनी जमावाला पिटाळल्यानंतर दहनविधी करण्यात आला.
भार्इंदर पश्चिमेच्या आंबेडकरनगर झोपडपट्टी भागात पालिकेची स्मशानभूमी आहे. सोमवारी मध्यरात्री कोरोनामुळे निधन झालेल्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणला. कोरोना रुग्णाचा मृतदेह असल्याचे कळताच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी दहनविधीला नकार देत पोबारा केला. आजूबाजूच्या रहिवाशांना याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने जमाव स्मशानभूमी बाहेर जमला.मृतदेहावर अंत्यसंस्कार येथे करु देणार नाही असे सांगत नागरिकांनी विरोध केला. पोलिसांना घटनास्थळी जात नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा मृतदेह जाळल्याने आजूबाजूच्यांना त्रास होणार नाही असे समजावूनही नागरिक ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवला. त्या नंतर मृतदेहावर दहनविधी केले.