कल्याण - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमामात थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालये अवास्तव बिल आकारत असल्याचे तसेच बिलांच्या वसुलीसाठी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेठीस धरत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. असाच प्रकार कल्याणमध्ये घडला असून, येथील एका रुग्णालयाने बिलाच्या वसुलीसाठी कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांची अडवणूक केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकाने पीपीई किट घालून थेट रुग्णालाच उचलून घरी नेले.रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ७० वर्षीय महिलेवर उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल करताना सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी ८० हजार रुपयांचा भरणा केला होता. १४ दिवसांच्या उपचारानंतर महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाने अजून ८० हजार रुपयांती मागणी केली.या अतिरिक्त बिलामुळे या महिलेच्या कुटुंबीयांना धक्का बसला. कशीबशी २० हजार रुपयांची जुळवाजुळव त्यांनी केली. तसेच या प्रकाराची माहिती शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांची भेट घेतली आणि झाल्या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा गायकवाड यांनी १० हजार रुपयांची मदत केली. मात्र ३० हजार रुपये घेण्यास रुग्णालयाने नकार दिला.अखेर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे संतापलेल्या गायकवाड यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. तसेच मी रुग्णाला घेऊन जातोय, हिंमत असेल तर अडवून दाखवा असे सांगत स्वत: पीपीई किट अंगावर चढवून संबंधित वृद्धेला उचलून रुग्णालयातून घरी नेले. या रुग्णालयाने पीपीई किटची फी पन्नास हजार रुपये लावली होती. दरम्यान, अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
coronavirus: कोरोनामुक्त रुग्णाला बिलासाठी अडवले, नगरसेवकाने रुग्णालयातून उचलून थेट घरी नेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 09:29 IST
एका रुग्णालयाने बिलाच्या वसुलीसाठी कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांची अडवणूक केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकाने पीपीई किट घालून थेट रुग्णालाच उचलून घरी नेले.
coronavirus: कोरोनामुक्त रुग्णाला बिलासाठी अडवले, नगरसेवकाने रुग्णालयातून उचलून थेट घरी नेले
ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालये अवास्तव बिल आकारत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेतकल्याणमधील एका रुग्णालयाने बिलाच्या वसुलीसाठी कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांची अडवणूक केलीया प्रकारामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकाने पीपीई किट घालून थेट रुग्णालाच उचलून घरी नेले