उल्हासनगर : कोरोनामुक्त म्हणून टाळ्यांच्या गजरात घरी सोडलेल्या एका रुग्णाला अवघ्या ४ तासांत उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात आणावे लागल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. हा रुग्ण कल्याण पूर्वेत राहणारा असून मुंबईच्या धर्तीवर पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला घरी पाठविले होते. मात्र दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मलवळकर यांचे म्हणणे आहे.
उल्हासनगरमधील कोरोना रुग्णालयात कल्याण पूर्वेतील एका रुग्णावर उपचार सुरू होते. पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याने मुंबईच्या धर्तीवर त्याच्यासह संभाजी चौक येथील पोलिसाला टाळ््यांच्या गजरात गुरुवारी सायंकाळी घरी पाठविले. मात्र दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, संभाजी चौकात राहणाऱ्या पोलिसाला होम क्वारंटाइन केले असून त्याची पत्नी व तीन मुलांवर उपचार सुरू आहेत.गुरुवारी रात्री कॅम्प नं-४, ३० सेक्शन परिसरात मेडिकलमध्ये काम करणाºयाला संसर्ग झाल्याचे उघड झाले. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या १८ झाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून, पालिकेने हा परिसर सील केला आहे.