टिटवाळा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, कल्याण तालुक्यात ग्रामीण भागात विवाहसोहळ्यांची धामधूम जोरात सुरू आहे. या सोहळ्यांना गर्दी होत असल्यामुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अशाप्रकारे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रमातील गर्दी टाळण्यासाठी महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे.गुरुवार, १९ मार्चला ग्रामीण भागात गावागावांत विवाहसोहळ्यांची धामधूम सुरू होती. या सोहळ्यांना शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमत असल्यामुळे चिंताजनक बाब आहे. याकडे पोलीस, महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या धोक्याविषयी जनजागृती आणि उपाययोजनाही करण्यात आलेल्या नाहीत. कुठे कुठे एखादा फलक दिसत आहे. तर प्राथमिक आरोग्यकेंद्राचे अधिकारीही गायब असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितले. सोहळे-समारंभांना वेळीच आवर न घातल्यास परिस्थिती चिघळू शकते, अशी भीती नीलेश देशमुख यांनी व्यक्त केली.विवाह सोहळ्यांत दिसणारी गर्दी अशीच राहिली तर कोरोना आजार पसरण्यास मदत होईल, हे धोकादायक आहे. गर्दी टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे.- डॉ. राम मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी.कोरोना आजाराची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. गर्दी टाळावी आणि केंद्र आणि राज्य सरकारलासहकार्य करावे.- आमदार किसन कथोरे
Coronavirus : कल्याण ग्रामीणमध्ये लग्नसोहळ्यांना होतेय गर्दी, तहसीलदारांचा कारवाईचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:36 AM