स्नेहा पावसकर ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी घरात राहण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र या सक्तीच्या सुट्यांच्या दिवसात घरात बसून कंटाळणाऱ्या लोकांना काही विरंगुळा किंवा त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने काही संस्था, लोकप्रतिनिधी, मंडळे यांच्यावतीने विविध आॅनलाइन स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजिल्या जात असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वजण गेल्या दीड महिन्यापासून घरातच आहोत. काही जणांना वर्क फ्रॉम होम असले तरी इतर घरात बसून कंटाळले आहेत. मात्र या लॉकडाउनच्या काळात घरातच थांबून बुद्धिला चालना देणारे असे अनेक आॅनलाइन उपक्रम सध्या राबविले जात आहेत. ठाण्यातील काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी सोशलमीडियाच्या माध्यमातून चित्रकला, कथालेखन, काव्यलेखन स्पर्धा आयोजिल्या आहेत. या सगळ्यासाठी विषयही कोरोनाच आहे आणि विविध वयोगटानुसार त्या घेतल्या जात आहेत. ही चित्रे दिलेल्या इमेलआयडीवर किंवा मोबाइलवर व्हॉटस्अॅप करायची असल्याने नागरिकांचाही घरबसल्या त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. काही संस्थांतर्फे कथावाचन, काव्यवाचन स्पर्धा आयोजिल्या जात असून सादरीकरणाचे व्हिडीओ पोस्ट करण्याचे सुचवले जाते. त्यानुसार अनेकजण या स्पर्धांत भाग घेऊन व्हिडीओ शेअर करताना दिसतात. महिलांसाठी आॅनलाइन पाककला प्रशिक्षणाचे सत्रही काहींनी सुरू केलेले आहे.एकूणच हा कोरोना संपेपर्यंत असे आॅनलाइन उपक्रम आम्ही रसिकांसाठी सादर करू, मात्र कोरोनानंतरही लोकांना याची सवय होऊ नये, अन्यथा कार्यक्रम स्थळी पाहायला येणाऱ्यांची संख्या कमी होईल, अशी चिंता एका कवीने व्यक्त केली.एरव्ही, उन्हाळी सुट्या म्हटले की, या काळात नवनवीन कार्यक्रमांची रसिकांसाठी पर्वणीच असते. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. तरीही, रसिकांना घरबसल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने काही संस्था किंवा काही कवी मंडळी एकत्र येऊन सोशल मीडियावर छोटेखानी संमेलने घेत आहेत आणि त्याला रसिकही कमेंटच्या माध्यमातून उत्तम दाद देत आहेत.