ठाणे : कोरोनाच्या या महामारीत ठाणे जिल्ह्यातील ९८८ बालकांचे व युवा-युवतींच्या आईवडीलांचे निधन झाले आहे. पालकांचे छायाछत्र हरवलेल्या या बालकांचे सुयोग्य पालनपोषण व पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या अध्यक्षतेखालील कृतीदलाची गुरुवारी येथील समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस सर्व महापालिकांच्या आयुक्तांची व संबंधीत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या अभुतपुर्व परिस्थितीमध्ये बालकांची काळजी व संरक्षण संबधित कार्यरत संस्थांमधील बालकांची सुयोग्य काळजी, कोरोनामुळे ज्या बालकांच्या आईवडीलांचे निधन झालै आहे, त्यांचे पुनर्वसनाचे नियोजन, विधवा झालेल्या महिलाना आर्थिक आधार आदींच्या नियोजनासाठी या बैठकीत आज सविस्तर चर्चा झाली. या महासाथीत जिल्ह्यातील 18 वर्षे वयाखालील एक पालक गमावलेली बालके 959 आहेत. तर 18 वर्षे वयाखालील आई व वडील असे दोन्ही दगावलेले बालके 29 आहेत. यामध्ये18 वर्षे वयावरील व 23 वर्षे आतील 15 बालके आहेत. याशिवाय विधवा महिला 669 आहेत. आदींच्या हिताच्या दृष्टीने व पुनर्वसन करण्यासाठी या बैठकीत उहापोह करण्यात आला.
जिल्ह्यातील 29 बालकांचे आईवडील,असे दोन्ही पालक कोरोना विषाणूमुळे मयत झाले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या वयाच्या 21 वर्षांनंतर व्याजासह 5 लाख रुपये अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. तर 959 बालके एक हजार 125 रुपये बालसंगोपन योजनेसाठी पात्र ठरलेली आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील 669 विधवा महिला पात्र आहेत. यावेळी एनजीओद्वारे शालेय मदतीसाठी 47 बालंकाची यादी प्राप्त झाली आहे.
विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबधित तहसिलदारांन त्वरित दिले आहे. शिक्षण अधिकारी यांनी कोविड कालावधीमध्ये ज्याचे पालक मृत्यू झाले आहेत, अशा बालकांच्या शालेय शुल्कासाठी मदत करण्यासाठी आवश्यक ती माहिती देण्याच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.