ठाणे : दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय कोरोना टास्क फोर्सने मृत्युदर आटोक्यात आणण्यासाठी उपापयोजना करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. कोरोनाग्रस्त अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरण्यात येत असलेले ‘रेमडेसिव्हिर’ हे इंजेक्शन सध्या मोलाची मदत करीत आहे. आता दोन महिने उलटल्यानंतर या इंजेक्शनच्या निविदा प्रक्रियेला पालिकेने सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात हे औषध मिळेपर्यंत जास्त कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागू शकतो. गेल्या दीड महिन्यात महापालिकेने ही प्रक्रि या का राबविली नाही, असा सवाल मनसेने केला आहे.ठाणे पालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुश्की ओढवली. मे महिन्यात मुंबई आणि ठाण्यामध्ये केंद्रीय कोरोना टास्क फोर्सने भेटी देऊन मृत्युदर कमी करण्यासंदर्भात महापौर आणि आरोग्य विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर मुंबई महापालिकेने तत्काळ निविदा काढल्यामुळे सध्या मुंबईत रेमडेसिव्हिर इंजेक्शन काही प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचवेळी ठाणे महापालिकेनेही निविदा काढली असती, तर अनेकांचे जीव वाचले असते, असा आरोप मनसेने केला आहे. पण, महापालिकेच्या कारभारामुळे ठाणेकरांचा जीव टांगणीला लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील एक हजार ४४५ रुग्णांना जीव गमवावा लागला असून, कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रात अनेक गंभीर रुग्ण आहेत, ज्यांना या औषधाची गरज आहे. पण, त्यांना हे औषध मिळत नसल्यामुळे डॉक्टरांनाही रुग्णाचा जीव वाचविण्यात अपयश येत आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी फक्त कागदी घोडे नाचविण्यापेक्षा आयुक्तांनी हे औषध वेळीच उपलब्ध करावे, अशी मागणी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.सिप्ला, हिटेरो या दोन कंपन्यांकडून रेमडेसिव्हिर या औषधाचे उत्पादन केले जाते. ते काही ठिकाणी विक्रेत्यांना न देता थेट रुग्णालयांना पुरविण्यात येत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे औषधाच्या मागणीतही वाढ झाली आहे. या इंजेक्शनची एका व्हायलची किंमत सध्या पाच हजार ४०० इतकी आहे. वाढत्या मागणीमुळे या औषधांचाही काळाबाजार सुरू झाला आहे.याचबरोबर टोसीलिझुमॅब नावाचे दुसरे महागडे इंजेक्शन काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांना दिले जात आहे. त्याची किंमत21,000ते ३२ हजारांच्या घरात आहे. पण, या औषधांचा काळाबाजार होत असल्याने ते वाढीव दराने विक्र ी होत आहे. ठाण्यातील रुग्णांना हे औषध लवकर उपलब्ध होत असताना काळाबाजार होणार नाही, याचीही दक्षता पालिकेने वेळीच घेणे आवश्यक असल्याचेही महिंद्रकर यांनी सांगितले.रेमडेसिव्हिर औषध हे ठाणे महानगरपालिकेच्या रु ग्णांना लागले, तर त्यासाठी त्यांना प्रतिव्हायल चार हजार १५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे औषध मुंबई महानगरपालिकेच्या रु ग्णालयांतील रुग्णांना मोफत मिळणार आहे. ठाणेकर नागरिकांना पुरेशा डोससाठी २० हजार ते २५ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने सद्य:स्थितीत हे औषध ठाण्यात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेने केली आहे.
coronavirus: रेमडेसिव्हिर औषधांच्या निविदा प्रक्रियेला महिनाभराचा विलंब, काळाबाजार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 2:29 AM