ठाणे : फिलिपाइन्स येथे शिक्षणासाठी गेलेल्या ५८ भारतीय विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावरून भारतात आणण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, खा. विनायक राऊत आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.फिलिपाइन्सच्या लास पिनियस शहरातील जोनाल्टा फाउंडेशन स्कूल आॅफ मेडिसिनमध्ये हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी फिलिपाइन्सहून १७ मार्च रोजी दुपारी भारतात येण्यासाठी आले होते. परंतु, मलेशियात त्यांना भारतात जाणारी सर्व उड्डाणे रद्द केल्याचे कळले.१८ मार्च रोजी सर्व मुले सिंगापूर विमानतळावर आल्यानंतर त्यांना येथूनही आपण भारतात जाऊ शकत नाही असे समजले. ही वस्तुस्थिती संसदेच्या सभागृहातही विचारे यांनी मांडली.त्यानंतर, बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री पी.व्ही. मुरलीधर राव आणि हरदीपसिंग पुरी यांच्याशी विचारे यांनी संपर्क साधून त्यांच्या कार्यालयाला ई-मेलद्वारेही माहिती दिली. त्यावेळी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कळवून लवकरात लवकर त्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याशिवाय, विचारे व खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार करून या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
Coronavirus : फिलिपाइन्समधील त्या ५८ विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 7:20 AM