ठाणे - गेल्या काही दिवसांपासून कोविड १९ विरोधात लढणारे ठाण्यामधील दुसरे आमदार हे आज रात्री अखेर ठाण्यातील त्यांच्या घरी परतले आहेत. तरी त्यांची रोज विचारपूस आणि काळजी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ही करत होते. कोरोनावर यशस्वीपणे मात करत त्या आमदारांनी आज घर वापसी केली आहे. त्यांच्या घरातील काम करणाऱ्या काहीना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मुंबईमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, अखेर शुक्रवारी उशिरा त्यांची कोरोना वर मात करत घर वापसी झाली आहे. पुढील 14 दिवस ते आता घरिच असणार आहेत.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात आज २३४ कोरोनाबाधित सापडले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 234 रुग्ण एकाच दिवशी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात शुक्रवारी सर्वात जास्त 13 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा शंभर झाला आहे.शुक्रवारी जिल्ह्यातील ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक 83 नवे रुग्ण नोंदवले गेले असून सर्वात जास्त 6 जणांच्या मृत्यूची ही नोंद ठामपामध्ये झाली आहे. त्यापाठोपाठ नव्या रुग्णांसह मृत्यूमुखी पडण्याची संख्या नवीमुंबईत आहे. तसेच नवीमुंबईने एक हजारांचा तर केडीएमसीने चारशेचा आकडा पार केला आहे.एकूण तीन हजार 139 रुग्णांपैकी एक हजार 48 रुग्ण हे एकट्या नवीमुंबईतील असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.