- अजित मांडकेठाणे : गेल्या २२ वर्षांत साडेतीन लाखांहून अधिक जणांवर अंत्यविधी केले. नातेवाईकांना रडताना पाहून सुरुवातीला मलाही रडू यायचे. परंतु, तीन-साडेतीन लाख जणांचे अंत्यविधी केल्यानंतर डोळ्यातले अश्रू नाहीसे झाले असे वाटत होते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही डोळ्यात अश्रू येत नव्हते. परंतु, कोरोनाने मात्र कोरड्या पडलेल्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आणले आहेत. कोरोनाग्रस्त मृताची मुलगी, मुलगा, पत्नी जेव्हा म्हणतात, ‘साहेब एकदाच चेहरा बघू द्या ना,’ तेव्हा मात्र आमच्याही डोळ्यातील अश्रूला वाट मिळते. हे बोल आहेत, ठाण्यातील जव्हारबागेत विद्युत दाहिनीवर काम करणाऱ्या एका बहाद्दर कामगाराचे. ख-या कोरोना योद्ध्याचे.जव्हारबाग स्मशानभूमीत काम करणारे जितेंद्र मकवना हे १९९२-९३ मध्ये ठेकेदारी पद्धतीवर मृतदेह जाळण्याचा कामाला लागले. या २२-२३ वर्षांतील त्यांचे प्रमोशन म्हणजे सरणावर जाळणारी मृतदेह आता विद्युत दाहिनीत जाळली जात आहेत. हे काम करताना त्यांचे मन कठोर झाले आहे. मृतांच्या नातेवाइकांचे रडणे ऐकून, त्यांचे दु:ख पाहून जितेंद्र यांचेही दु:ख आणि अश्रू जणू संपले आहेत. हृदय कठोर झाले आहे. हे काम करीत असताना एखादा व्यक्ती मरणे, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे ही सामान्य बाब झाली आहे. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हाही त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले नाहीत. परंतु, कोरोनाच्या संकटाने त्यांना बदलून टाकले आहे.200कोरोनाग्रस्तांवर केले अंत्यसंस्कारठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावल्याने त्याचा अंत्यविधी याच स्मशानभूमीत करण्यात आला. १८ एप्रिलला एका सधन घरातील ती व्यक्ती कोरोनाला पराभूत करू शकली नसल्याने मृत झाली. तोपर्यंत त्या व्यक्तीचा मुलगा, सून, पत्नी या सगळ्यांना विलगिकरण केले होते. त्यामुळे त्यांना या व्यक्तीच्या अंत्यविधित सामील होता आले नाही.त्यांच्या मुलाला स्वत:च्या हाताने अग्नी देता आला नाही. त्याच्यासाठी शेवटचे रडणाराही कोणी नाही. हे पाहून जितेंद्र एवढ्या वर्षानंतर पाहिल्यांदाच गहिवरले. एवढ्या मोठ्या माणसाला शेवटचा निरोप द्यायलाही कोणी नाही. रुग्णालयातून त्यांचा देह घेण्यापासून तो दाहिनीमध्ये घालण्यापर्यंत सगळीच जबाबदारी जितेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आली. जितेंद्र यांना वाटले हे दृश्य एवढ्यावरच संपेल. पण तसे अजिबात झाले नाही. १८ एप्रिलपासून त्यांनी २०० च्या जवळ कोरोना मृतदेहांची विल्हेवाट लावली. विद्युतदाहिनीत त्यांचा अंत्यसंस्कार केला. हे सगळे केल्यावर मात्र पुन्हा एकदा रडू येऊ लागले आहे.शासन कर्तव्यापुढेमाणुसकी विसरावी लागतेकोरोनाबाधित मृतदेह नष्ट करताना खूप काळजी घ्यावी लागते. स्वत:च्या शरीराभोवती पीपीई किट परिधान करून मृतदेह हाताळावा लागतो. रुग्णालयातून आलेला मृतदेह पूर्णपणे झाकलेला असतो.अशावेळी परवानगी घेऊन स्मशानभूमीत आलेले मृतांची पत्नी, मुलगा, मुलगी जेव्हा हंबरडा फोडून, ‘साहेब, एकदाच तोंड दाखवा, शेवटचे दर्शन घेऊ द्या, जवळ जाणार नाही, लांबूनच बघू,’अशी विनवणी करतात, तेव्हा मात्र आमचाही जीव कासावीस होतो. त्यांची विनवणी ऐकून वाटते थोडे तोंड उघडे करून दाखवावे, पण कर्तव्य आणि आम्हाला शासनाने दिलेली सक्त ताकीद लक्षात येते आणि डोक्यात अश्रू दाटलेले असतानाही तो देह तसाच विद्युतदाहिनीत ढकलून त्याचे दार बंद करावे लागते. त्यानंतर एखाद्या अपराध्यासारखी नजर चुकवून नातेवाईकांना बाहेर जायला सांगावे लागते. जितेंद्र यांचा हा अनुभव माणसाला त्याची खरी ओळख करून देणारा आहे.
coronavirus: ...आटलेले अश्रू कोरोनामुळे पुन्हा दाटले, विद्युतदाहिनीवरील कोरोना योद्धयाचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 2:16 AM