- विशाल हळदे
ठाणे : कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहे. त्याचा विपरित परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. यावर ठाण्यातील ब्रह्मांड सोसायटी सर्वाधिक चांगल्याप्रकारे मात करत आहे. ब्रह्मांड फेज 6 मधील रहिवाशांनी येथील एक हजार कुटुंबांचे लॉकडाऊनमध्ये मनोरंजन करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यासाठी अनोखा उपक्रमही सुरु केला आहे.
सोसायटीतील काही रहिवाशांनी सोसायटीच्या आवारातच गिटार हातात घेऊन गाण्यांचा नजराना पेश केला. काहींनी झुंबा, तर काहींनी वेगवेगळी गाणी गायिली. त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनातील भीती तर कमी झालीच, शिवाय कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी एक प्रकारे उर्जादेखील मिळाली.लॉकडाऊनमुळे नागरीकांना दिवसभर घरीच राहावे लागत आहे. त्यामुळे घराघरात चिडचिड सुरु झाली आहे. रहिवाशांचे मनोरंजन करुन यातून बाहेर पडण्यासाठी सोसायटीमधील काही नागरिकांनी पुढाकार घेतला. ब्रह्मांड फेज सहा मध्ये आठ इमारती असून, 218 फ्लॅट आहेत. यामध्ये एक हजाराहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांचे मनोरंजन आता अनोख्या पद्धतीने केले जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मागील आठवडय़ातील बुधवारी सुमधूर गाण्यांनी झाला.
कोरोनाविरुद्ध लढणा-या काही फायटर्सना या सोसायटीत सायंकाळी बोलावण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचा सत्कार सोसायटीच्यावतीने करण्यात आला. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, पत्रकार, डॉ. श्याम पालीवाल, डॉ. राजेंद्र चोहान, तसेच ठाणो महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, सोसायटीचे सुरक्षा रक्षक आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी यावेळी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करत सत्काराबद्दल रहिवाशांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सोसायटीचे सचिव शिवकुमार यांनी मान्यवरांचे आभार मानून, लॉकडाऊनच्या काळात रहिवाशांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. लॉकडाऊन वाढवल्यानंतरही अशाच प्रकारे रोज एक तास नागरिकांना घरातच राहून ही मनोरंजनाची साधने उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.