मुरलीधर भवार
कल्याण : भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा येथे क्वारंटाइन सेंटर तसेच संशयित आणि कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केली आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षदर्शींच्या मते वस्तुस्थिती वेगळीच आहे. येथील असुविधांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अगोदर कोरोनाचे भय आणि त्यात सुविधांची वानवा या कात्रीत सर्वसामान्य रुग्ण सापडले आहेत.
डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील सागर्ली येथे राहणारी महिला एका रुग्णालयात आयाचे काम करते. पती, दोन मुले असा तिचा संसार. तिला लागण झाल्याने टाटा आमंत्रामध्ये ठेवण्यात आले. त्या बऱ्या होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र लहान मुलाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा आठ दिवसांनी त्यांची रवानगी टाटा आमंत्रा येथे करण्यात आली. सगळ््या कुटुंबाला तेथेच क्वारंटाइन करण्यात आले. त्यांनी सांगितले की, मुलाला औषध दिले नाही. ताप, थंडी, सर्दी- खोकला झाला, तरी डॉक्टर येत नाहीत. एकदा रात्रीच्या जेवणात दिलेली भाजी पुन्हा सकाळी दिली. ती भाजी आंबलेली होती. गरम पाणी दिले गेले नाही. एक दिवस तर पाणीच नव्हते. पोळ््या नीट भाजलेल्या नसल्याने त्या खाणार कशा, असा सवाल त्यांनी केला.
शेजारच्या खोलीतील एका रुग्णाने सांगितले की, त्यांच्या गरोदर पत्नीला मुंबईतील गरोदर महिलांच्या कोविड रुग्णालयात ठेवले आहे. मात्र दोन वर्षाचा लहान मुलगा त्यांच्यासोबत क्वारंटाइन आहे. त्या मुलाला दूध दिलेले नाही. मुलाला व त्यांना तपासण्याकरीता डॉक्टर आलेले नाहीत. उंबर्डे येथे राहणाºया चालकास प्रथम शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविले गेले. त्याठिकाणी कोविड रुग्ण होते. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना ‘टाटा’ला पाठविले गेले. पाच दिवस ठेवल्यावर मी स्वत: च्या मर्जीने घरी जात आहे, असे लिहून घेतले. निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट दिला नाही. गोळ््याही दिल्या नाहीत. त्यांना काही झालेच नव्हते तरी त्यांच्यासह कुटुंबीयांना १४ दिवस टाटात काढावे लागले. एका रुग्णाला चक्क घरातून बिºहाड घेऊन या, असे सांगितले. बेड नसल्याने जमिनीवर झोपण्याची वेळ आली. त्यानंतर त्याला बेड दिला. शनिवारी पाणी आलेच नाही. त्यामुळे प्रातर्विधी कसा उरकायचा, असा प्रश्न निर्माण झाला. पिण्यासाठीही पाणी नव्हते. एका रुग्णाने अस्वच्छतेचा व्हिडीओ काढून व्हायरल केला होता. कोविड रुग्णांना फळे दिली जात नाही. पोळ््या नीट भाजलेल्या नसतात, अशा तक्रारी रुग्णांनी केल्या.क्वारंटाइनसाठी ५१५ खोल्या आणि १०३० बेडची सुविधा आहे. कोविड रुग्णांकरिता ७०० खोल्या आणि १४०० बेडची सुविधा आहे. दररोज १८०० जणांचे जेवण व नाश्ता केला जातो. शेवटच्या रुग्णाला जेवण पोहोचेपर्यंत थंड होते. मात्र जेवण ताजे दिले जाते. शनिवारी स्टेमचा पाणीपुरवठा बंद होता. रुग्णांनी नळ चालू ठेवल्यामुळे पाणी वाया गेले. - घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता, टाटा आमंत्रा