- स्रेहा पावसकरठाणे : पूर्वी कुटुंबीयांसोबत पुरेसा वेळ घालवायचा म्हणजे सुटी काढावी लागत असे. परंतु, लॉकडाउनमुळे बहुतांश जण कुटुंबासोबत मनसोक्त वेळ घालवत आहेत. इतकेच नव्हे तर हा लॉकडाउन ठाणे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या जोडप्यांपैकी जवळपास निम्म्या जोडप्यांसाठीही एक नवी सुरुवात ठरला आहे. क्वारंटाइनमुळे सक्तीने एकत्र घालवावे लागलेले क्षण त्यांच्या एकत्र राहू इच्छिण्यासाठीही कारणीभूत ठरत आहेत.लॉकडाउनमुळे अनेकजण एकत्र कुटुंबाचा अनुभव घेत आहेत. सक्तीने घरी राहावे लागत असल्यामुळे ज्येष्ठ मंडळी, आईवडिलांशी संवाद वाढू लागला आहे. किशोरवयीन मुलांशी विविध विषयांवर चर्चा होत आहेत. लहान मुलांसोबत खेळण्यातही आनंद शोधला जात आहे. याचा परिणाम म्हणजे नात्यांची विण घट्ट झाली आहे. वादविवादापेक्षा संवादाने काही प्रश्न सुटू लागले आहेत. आईवडील घरी सोबत असल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.लॉकडाउनपूर्वी ठाणे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाच्या काही केसेस सुरू होत्या. लॉकडाउनमुळे कुठे बाहेर जाणं नाही, की आॅफिस नाही. परिणामी, एकमेकांसोबत वेळ घालवण्यापलीकडे या जोडप्यांना पर्याय नव्हता. न्यायालयातर्फेही या जोडप्यांच्या, विशेषत: महिला पक्षकारांच्या काउन्सिलिंगसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली. याद्वारे अनेक जोडप्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाय शोधण्यात आले. विशेष म्हणजे घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या पण या क्वारंटाइनमध्ये एकत्र वेळ घालवलेल्या अनेक जोडप्यांनी आता आपण पुन्हा कायमस्वरूपी एकत्र राहू इच्छित असल्याचे सांगितले आहे.एरव्ही, ठरवूनही कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. लॉकडाउनमुळे ते सहज शक्य झाले आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी आणि मुलांशी गप्पा मारण्याबरोबरच त्यांच्या समस्या जाणून घेता येत आहेत. सक्तीचा क्वारंटाइन अनेकांनी फॅमिली टाइम म्हणून एन्जॉय केलेला दिसतो. घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या काही जोडप्यांमधील वाद या लॉकडाउनमध्ये वाढले असले, तरी निम्मी जोडपी पुन्हा एकत्र कुटुंब म्हणून राहू इच्छितात.- डॉ. माधवी देसाई, निवृत्त विवाह समुपदेशक, ठाणे कौटुंबिक न्यायालय
सक्तीच्या लॉकडाउनमुळे जोडली जाताहेत कुटुंबे, घटस्फोटासाठी अर्ज केलेली निम्मी जोडपी पुन्हा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 3:53 AM