मुंबई : राज्याच्या कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येत मध्यमवयीन व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या राज्यात ७० हजार ७९९ एवढ्या मध्यमवयीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.राज्यात एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील ३३ हजार ९४५ रुग्ण, तर ३१ ते ४० वयोगटातील ३६ हजार ८५४ रुग्ण आहेत. अतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, मात्र आता या टप्प्यावर सर्व वयोगटातील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. किरण वैकुंठे यांनी सांगितले. प्रत्येकाने स्वत:पासून आरोग्यविषयक खबरदारी घेतली, तर संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच आहे. जे प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येतात आणि येत आहेत अशा डॉक्टर्स, परिचारिका, किंबहुना एकूणच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जास्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना गंभीर आजार आहे हे खरे असले तरी कोरोनाबरोबरच इतरही रुग्ण आहेत, हे लक्षात ठेवायला हवे. आता वातावरण बदलले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. अशा काळात दमा, सीओपीडी, हृदयविकार यासारखे आजार डोके वर काढत आहेत. ज्यांना कोरोना नाही, पण इतर दीर्घकालीन आजार आहेत, विविध प्रकारचा कर्करोग आहे, असेही उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी आरोग्यव्यवस्था सदैव सुसज्ज असणे गरजेचे आहे.राज्यात ४१ ते ५० वयोगटातील ३३ हजार ५५२ कोरोना रुग्ण आहेत. तर ५१ ते ६० वयोगटातील ३२ हजार २१ रुग्ण, ६१ ते ७० वयोगटातील १९ हजार ४९५ रुग्ण आहेत.राज्याच्या रुग्णसंख्येत कोरोनाची बाधा झालेल्या शून्य ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे प्रमाण ३.६४ टक्के असून रुग्णसंख्या ६ हजार ७४३ आहे.११ ते २० वयोगटातील १२ हजार २१७ रुग्ण असून त्याचे प्रमाण६.५९ टक्के आहे.
coronavirus: राज्यात मध्यमवयीन व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक लागण, रुग्णसंख्या ७०,७९९ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 6:28 AM