ठाणे :कोरोनाविषयी नागरिकांना शंका वाटल्यास आता त्यांच्यासाठी दूरध्वनीवरून विविध विषयातील तज्ज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त विजय सिंघल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या माध्यमातून सोशल डिस्टन्सचा महत्वाचा उद्देशही साध्य होणार आहे.
यासंदर्भातील खासगी प्रतिथयश तज्ज्ञ डॅाक्टरांची यादी महापालिकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये फॅमिली, फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, युरॅालॅाजिस्ट, सोनालॅाजिस्ट, रेडिओलॅाजिस्ट, बालरोग तसेच मधुमेह तज्ज्ञ आदी विविध तज्ज्ञ आणि प्रतिथयश डॅाक्टरांचा समावेश आहे.
या सर्व तज्ज्ञ डॅाक्टरांची नावे आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक महापालिकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून नागरिकांना त्यांच्यांशी दूरध्वनीवरून सल्ला घेता येवू शकणार आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.