भिवंडी : राज्यासह भिवंडीतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी शहरातील वेताळपाडा येथे दोन महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असतांनाच आता शहरातील मानसरोवर येथे औरंगाबाद कन्नड येथून उपचारासाठी येऊन भावाकडे राहिलेल्या 51 वर्षीय इसमाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता हा रुग्ण राहत असलेला परिसर देखील सील करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. तसेच, हा रुग्ण ज्या दवाखान्यात डायलेसिससाठी गेला होता, तो दवाखाना देखील सील करण्यात येण्याची शक्यता आहे. याचबरोबर रुग्णाच्या घरातील 4 चार जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देखील डॉ. धुळे यांनी दिली आहे.
दरम्यान आज (बुधवारी) आढळलेल्या या रुग्णामुळे आता भिवंडी शहरातील एकूण रुग्णांची संख्या 6 झाली आहे. तर भिवंडीतील ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. कशेळी येथील ठाणे मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डावकर यांनी दिली आहे.
कशेळीत राहणारे ठाणे मनपाच्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते. या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या पाच जणांपैकी 91 वर्षीय आईसह सून व मुलगी या तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर मोठा मुलगा आणि पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी या दोन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. डावकर यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या देखील आता 6 वर पोहोचली आहे.
शहरात 6 आणि ग्रामीण भागात 6 अशी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने भिवंडीकरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर लॉकडाऊनच्या काळात चोख बंदोबस्त असतांनाही शहरामध्ये बाहेर गावातून नागरिक शहरात येतातच कसे असा प्रश्न दक्ष नागरिक विचारात आहेत.