कल्याण: कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाची लागण झालेले 27 नवे रुग्ण आढळून आले आहे. नव्या रुग्णांमध्ये डोंबिवलीतील खाजगी डॉक्टरसह मुंबईतील नर्स, पोलिस यांचा समावेश आहे. महापालिका हद्दीत एकूण रुग्णांची संख्या 280 झाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील 69 वर्षीय खाजगी डॉक्टरला कोरोना झाला आहे. कल्याण पूर्व व पश्चिमेतील दोन व डोंबिवली पूर्व पश्चिमेतील दोन अशा चार नर्सना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन नर्स या सरकारी रुग्णालयात मुंबईत कार्यरत आहे. तर एक नर्स ही ठाण्यातील खाजगी रुग्णालयात कार्यरत आहे. कल्याण पूर्वेतील तीन सरकारी कर्मचा-यांना कोरोना झाला आहे. दोन पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एक पोलीस हा कल्याण पश्चिमेत तर दुसरा कल्याण पूर्वेत राहणारा आहे. तर वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्तव्य बजाविणारा पोलीस कर्मचारीही कोरोनाचा शिकार झाला आहे. सरकारी सेवेतील सुरक्षा रक्षकालाही लागण झाली आहे. तो कल्याण पूर्वेत राहणारा आहे. डों
बिवली पश्चिमेतील महिला लॅब टेक्निशियन तसेच गुजरात येथील खाजगी कंपनीत काम करणारा यालाही कोरोना झाला आहे. गुजरातच्या कंपनीत काम करणारा डोंबिवली पूर्वेत राहतो. महिला फार्मासिस्ट हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. ती कल्याण पश्चिमेत राहते. कल्याण पूव्रेतील वाशी येथे काम करणारा कर्मचा-यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचा-यास कोरोना झाला आहे. बाजार समितीतील कर्मचारी हा डोंबिवली पश्चिमेला राहणारा आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखीन एका कर्मचा-यास कोरोनाची लागण झाली आहे. तो डोंबिवली पूर्वेत राहतो.
कल्याण पश्चिमेतील चार जण हे कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाला आहे. कल्याण पश्चिमेतील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. नव्या आढळून आलेल्या 27 रुग्णांपैकी 20 जण हे मुंबई, ठाणे, वाशी याठिकाणी काम करणारे आहेत. एक रुग्ण हा परराज्य गुजरात येथून आलेला आहे. शहरातील केवळ सातच रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 76 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 200 आहे.