कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा हा दर एमएमआर रिजनमध्ये अव्वल ठरला आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णदुपटीचा दर (डबलिंग रेट) २०९ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे ही बाब समाधानकारक आहे.मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चमध्ये सुरू झाला. आतापर्यंत कोरोनाचे ५० हजार रुग्ण आढळले, तर एक हजार एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जूनमध्ये रुग्ण वाढायला लागले. जुलैमध्ये एका दिवसाला ६०० च्या आसपास व त्याहीपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. मनपाने त्यावर मात करण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले. तापाचे दवाखाने सुरू केले. सर्वेक्षणावर जास्त भर दिला. जम्बो कोविड केअर सेंटर व रुग्णालये सुरू केली. ‘फॅमिली डॉक्टर कोविडयोद्धा’ ही मोहीम राबविली. सध्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत पाच लाख १५ हजार घरांचे सर्वेक्षण केले. काही काळापुरते धारावी पॅटर्न, डोंबिवली पॅटर्न असेही प्रयोग केले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावत आहे. आज दिवसाला केवळ १५० ते २०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत असून, ही समाधानकारक बाब आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.मनपा हद्दीत कोरोनाबाधितांचा मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आत आहे. तर, रुग्णदुपटीचा दर २०९ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या कमी होत असताना रुग्णदुपटीचा दर कमी झाला, तर त्याचा फारसा फरक पडत नाही. पण ती एक जमेची बाजू ठरते. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १०० टक्क्यांवर पोहोचवण्याचे लक्ष्य मनपाचे असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.
दिवसाला दोन हजारांपर्यंत चाचण्यामनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या, दररोज दोन हजारांपर्यंत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. मनपाने आतापर्यंत आरटीपीसीआर आणि ॲण्टीजेन, अशा दोन्ही मिळून एक लाख ९५ हजार चाचण्या केल्या आहेत. चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर हा १० टक्क्यांच्या आतच आहे. तो आजमितीस सहा टक्के आहे. मनपाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात जी घरे सुटली होती, त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे.