कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डोंबिवली क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृहात डेडीकेटेड कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. सध्या या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, गुरुवार, २ जुलैपासून ते रुग्णांसाठी खुले केले जाईल, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या कोविड हेल्थ सेंटरमध्ये २०० खाटा आहेत. त्यापैकी १७० खाटा आॅक्सिजन युक्त तर, ३० खाटा आयसीयूच्या असणार आहेत.
डोंबिवली जिमखान्यातही कोविड हेल्थ सेंटर उभारले जात आहे. तेथे आॅक्सीजनयुक्त ३०० खाटा तर, आयसीयूची सुविधा असलेल्या १५० खाटा असतील. कल्याण पश्चिमेतील फडके मैदानाजवळ डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू केले जाणार आहे. तेथे आयसीयूच्या १२० खाटा, तर आॅक्सिजनच्या २५० खाटा असणार आहेत. हे दोन्ही कोविड हेल्थ सेंटर २० जुलैपर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज करण्याचा मानस शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिंदे यांनी रविवारी क्राडीसंकुलातील कोविड सेंटरच्या कामाची पाहणी केली. तसेच जिमखान्यातील कोविड सेंटरच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.प्रत्येक वॉर्डात ३०० खाटांचे नियोजनकेडीएमसी हद्दीतील रुग्णसंख्या १५ जुलैपर्यंत २० हजारांच्या घरात पोहोचण्याचा अंदाज असल्याने सूर्यवंशी यांनी महापालिका हद्दीतील १० प्रभाग अधिकाऱ्यांना प्रत्येक वॉर्डमध्ये ३०० खाटांची व्यवस्था करण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी स्थानिक नगरसेवकांची मदत घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांत एकूण १२२ वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये ३०० बेडची सुविधा तयार झाल्यास महापालिका हद्दीत ३६ हजार ६०० खाटा उपलब्ध होऊ शकतात.