कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून रुग्णांमध्ये 20 दिवसांच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 162 झाली आहे.
कोरोना बाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने डोंबिवली पूर्वेतील 20 दिवसांच्या बाळास कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील 33 वर्षीय महिला देखील कोरोना रुग्णच्या सहवासात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली आहे. टिटवाळा येथे राहणा-या 42 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. ही महिला मुंबईतील खाजगी रुग्णालयात काम करते.
कल्याण पूर्वेतील 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. तो देखील मुंबईतील शासकीय आरोग्य खात्यात कामाला आहे. त्याचबरोबर वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणा-या दोन कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्ही कामगार डोंबिवली पश्चिमेला राहतात. आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 47 जण बरे झाल्याने त्यांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे.
आजमितीस 112 जण उपचार घेत आहेत. कल्याण डोंबिवली हद्दीत एकूण रुग्णांपैकी सगळ्य़ात जास्त रुग्ण हे डोंबिवलीत आहे. डोंबिवलीतील रुग्ण संख्या 98 आहे. उर्वरित रुग्ण हे कल्याण पूर्वेत 30 व कल्याण पश्चिमेत 21 रुग्ण आहे. मांडा टिटवाळ्य़ात 6 व मोहने परिसरात 6 रुग्ण आहे. नांदिवली परिसरात एक रुग्ण मिळून आला आहे.