डोंबिवली - दोन दिवसांपूर्वी डोंबिवली शहरात कोरोना बाधित आढळून आलेल्या पहिल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्याच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे रुग्णाच्या पत्नीला आणि मुलीला कोरोनाची लागण झालेली नसल्याचे तपासणीत समोर आले आहे असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
डोंबिवलीत कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याने आता केडीएमसी महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. दरम्यान पाचमधील दोन रुग्ण पुर्णपणे बरे झाले असून यातील तीन वर्षाच्या लहान मुलीला घरी सोडण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी दिली. कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलीला कोरोनाची लागण झाली होती. यामधील मुलीला घरी सोडण्यात आले असून तीच्या आईला देखील उदयापर्यंत घरी सोडले जाईल असे पानपाटील यांनी सांगितले. त्या महिलेच्या पतीवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कल्याणमधील आणखीन एक रुग्ण असून त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान, डोंबिवलीत आढळून आलेला ३५ वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वी पेरु या देशातून आला होता. त्याला ताप होता तसेच कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला दोन दिवसांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारच्या सूचनेनुसार केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने रुग्ण राहत असलेल्या १ कि.मी परिसरात सर्वे करुन तेथील नागरीकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळतात का याची तपासणी केली तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.