- कुमार बडदे मुंब्रा : तीन महिन्यांमध्ये मुस्लिमबहुल मुंब्य््राात मुस्लिम नागरिकांच्या मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कबरस्तानमधील मृतदेह दफन करण्याची जागा वेगाने कमी होत आहे. जागेअभावी येथील तीनपैकी एक कबरस्तान पुढील काही दिवसांमध्ये लॉकडाऊन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कौसा गाव, एमएम व्हॅली तसेच अमृतनगर भागातील फकरुद्दीन शहा बाबा दर्ग्याजवळ कबरस्तान आहेत. यातील पावणेदोन एकर भूखंडावरील दर्गा कबरस्तानमध्ये १६00 मृतदेह दफन करण्यात आले आहेत. यामध्ये २00 मृतदेह लहान मुलांचे आहेत. तीन महिन्यांपूर्वी या कबरस्तानमध्ये महिन्याकाठी सरासरी ५0 ते ६0 मृतदेह दफन करण्यासाठी येत होते. परंतु, त्यामध्ये अचानक वाढ होऊन मार्च महिन्यात ७५, एप्रिल महिन्यात ९१, मेमध्ये १६0 आणि १ ते १५ जूनदरम्यान १२५ मृतदेह या कबरस्तानमध्ये दफन करण्यात आले. त्यामुळे सध्या येथे आणखी अंदाजे ८0 मृतदेह दफन करण्याची जागा उरली आहे. यानंतर, येथे जागाच शिल्लक राहणार नसल्यामुळे पुढील सहा महिन्यांसाठी कबरस्तान बंद करावे लागू शकते, अशी माहिती कबरस्तान कमिटीचे चेअरमन हानीफ शेख यांनी दिली.मुंब्य्रातील एमएम व्हॅलीजवळील कबरस्तानमध्ये सध्या दररोज जवळपास २२ ते २५ मृतदेह दफन करण्यासाठी येत आहेत. पूर्वी ही संख्या फक्त दोन ते तीन होती. येथे मृतदेह येण्याचे प्रमाण वाढले असले, तरी दफनविधीसाठी अद्यापही मुबलक जागा शिल्लक असल्याची माहिती या कबरस्तान कमिटीचे सचिव लियाकत ढोले यांनी दिली.कौसा भागातील स्थानिक नागरिकांसाठी असलेल्या कौसा कबरस्तानमध्येही सध्या दररोज दोन ते तीन मृतदेह दफन करण्यासाठी येत असल्याचे ढोले यांनी सांगितले. दरम्यान, सुरुवातीच्या काळात कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीमुळे ते औषधोपचारासाठीही रुग्णालयात जाण्याचे प्रकर्षाने टाळत होते.काहींना विविध कारणांमुळे वेळीच उपचार मिळाले नाही. या आणि इतर काही कारणांमुळे मागील काही महिन्यांत येथील मृत्युदर वाढला असावा, असे मुंब्रा डॉक्टर्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोईनुद्दीन राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
CoronaVirus News: कबरस्तान ‘लॉकडाऊन’ होण्याची भीती; मृतांची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:54 AM