मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा कहर वाढत असून मंगळवारी एका दिवसात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बळींची संख्या ८२३ वर पोहचली आहे.
मंगळवारी ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चालू वर्षातील एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. मंगळवारी शहरात २११ नवे रुग्ण सापडले आहेत. भाईंदरमध्ये १०५ तर मीरारोडमध्ये १०६ नवे रुग्ण सापडले आहेत.
शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २०८६ इतकी झाली आहे. तर आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ४९२ वर पोहचली आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच कोरोना बळींची संख्या सुद्धा वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोरोना संसर्ग वाढण्यास मास्क न घालणारे व गर्दी करणारे बेजबाबदार नागरिक, नगरसेवक व राजकारणी, फेरीवाले - दुकानवाले आदी जबाबदार असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस आणि पालिकेने करावी. कारण जे प्रामाणिकपणे नियम पाळत आहेत त्यांना सुद्धा अशा बेजबाबदार लोकांमुळे कोरोना संसर्गाची भीती आणि पुन्हा लॉकडाऊनचा धोका वाढला असल्याचा मुद्दा जागरूक नागरिकांनी उपस्थित केला आहे.