सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका कोविड रुग्णालयात फक्त ४ रुग्ण उपचार घेत असून शहरात एकूण ८० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ प्रकाश जाधव यांनीं दिली. कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी आरोग्य विभाग सतर्क व सज्ज असून डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह इतर पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचाही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रिजेन्सी अंटेलिया येथे २०० बेडचे अद्यावत रुग्णालय उभे करण्यात यश आले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८० वर आली. अशीच परिस्थिती राहिल्यास शहर लवकरच कोरोना मुक्त होण्याचा विश्वास महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ प्रकाश जाधव यांनी व्यक्त केला. कोरोनाची लाट असताना महापालिकेने शांतीनगर येथील प्लॅटिनिय खासगी रुग्णालय दरमहा २६ लाखाने भाडेतत्त्वावर घेतले. तर राज्य शासनाचे कॅम्प नं-४ येथील शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन, रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णलायात केले. या व्यतिरिक्त महापालिकेने कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णालयावर उपचार करण्यासाठी कॅम्प नं-५ येथील तहसील कार्यालयाची नवीन इमारत ताब्यात घेतली. मध्यवर्ती रुग्णालय, रेडक्रॉस रुग्णालय येथेही कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी सुखसुविधा निर्माण केली.
एकूण पॉझिटिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ८० वर
महापालिका आरोग्य विभागाने देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात उत्तम आरोग्य सुविधा दिल्याने, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊन कोरोना रुग्णाची संख्या घटली. शहरात एकूण पॉझिटिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ८० वर आली. महापालिकेच्या शांतीनगर येथील प्लॅटिनियम कोविड रुग्णालयात फक्त ४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४६ रुग्ण होम क्वारंटाईन, २० रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालयात तर १० रुग्ण शहरा बाहेरील रुग्णालयात उपचार घेत आहेत. कॅम्प नं-४ येथील महापालिका कोविड रुग्णालय, रेडक्रॉस रुग्णालय, मध्यवर्ती रुग्णालय व कॅम्प नं-५ येथील तहसील इमारतीच्या आरोग्य केंद्रात एकही कोरोना रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनी दिली. एकूणच शहर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे बोलले जात आहे.
साई प्लॅटिनियम रुग्णालयाची पाहणी
महापालिकेने दरमहा २६ लाख रुपये भाडेतत्त्वावर घेतलेल्या साई प्लॅटिनियंम रुग्णालयात फक्त ४ कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहे. २०० बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात उंदीर असल्याची माहिती उपायुक्त डॉ प्रकाश जाधव यांना मिळताच त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून उंदराचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.