मीरारोड - महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी भाईंदर मधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवत मीरा भाईंदर मधील अन्य भागात मात्र सम विषम पद्धतीने दुकाने, व्यवसाय उघडण्यास परवानगी दिली आहे . परंतु लॉकडाऊन शिथिल होताच बेजबाबदार लोकांनी खरेदीसाठी गर्दी करून सोशल डिस्टंसिंग धाब्यावर बसवल्याने लॉकडाऊन हटवण्यावरून राजकीय इशारेबाजी करणारे राजकारणी व नगरसेवक कुठे लपले ? असे सवाल जागरूक नागरिक करत आहेत .
मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले . त्यामुळे आयुक्तांनी 1 ते 10 जुलै दरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केले . ठाणे , कल्याण आदी जिल्ह्यातील अन्य महापालिकांनी लॉकडाऊन वाढवल्याने मीरा भाईंदर मध्ये देखील 18 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले .
एकीकडे लॉकडाऊन वाढवले असताना दुसरी कडे मास्क न घालता नाहक फिरणारे , शहरात भाजी - मासळी खरेदीसाठी गर्दी , बेकायदा फेरीवाले व चोरून दुकाने उघडणारे तसेच व्यायामाच्या नावाने बाहेर गर्दी करणारे सतत दिसून आल्याने लॉकडाऊन बाबत प्रशासनासह राजकारणी , नगरसेवक देखील दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले .
एकीकडे लॉकडाऊन आणि सुरक्षेच्या निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे या बाबत मूग गिळून गप्प बसणाऱ्या बहुतांश नगरसेवक , राजकारण्यांनी दुसरीकडे लॉकडाऊन वाढवल्यास आंदोलन करू असे इशारे देत आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरु केले . त्यामुळे आयुक्त लॉकडाऊन बाबत काय भूमिका घेतात या कडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते .
परंतु आयुक्तांनी भाईंदर मधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवले आहे . या 10 हॉटस्पॉट मध्ये भाईंदरचे सरस्वती नगर , साईबाबा नगर , गोडदेव नाका - बाळाराम पाटील मार्ग परिसर , सेना नगर गोडदेव गाव परिसर , खारीगाव - बाळाराम पाटील मार्ग परिसर, शिर्डी नगर , आर एन पी पार्क , मुर्धा रेव आगर , राई शिवनेरी गल्ली 23, पाली सुंदर गल्ली पेट्रोल पंप चौक या परिसराचा समावेश आहे .
या हॉटस्पॉट भागात लॉकडाऊन काटेकोर पाळला जावा यासाठी पोलीस व पालिका प्रशासन भर देणार आहे . परंतु त्याच बरोबर लॉकडाऊन शिथिल केलेल्या मीरा भाईंदर मधील बहुतांश भागात देखील सुरक्षा निर्देशांची काटेकोर अमलबजावणी करण्याची जबाबदारी पालिका व पोलिसांवर आली आहे .
आयुक्तांनी जरी केलेल्या आदेशात मॉल, मार्केट , शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहणार आहे . तर बाजारपेठ , भाजी मार्केट , दुकाने हि सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत सम - विषम तत्वावर सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे . या शिवाय शासनाच्या पुनश्च हरिओम अभियान अंतर्गत व्यवसाय , कारखाने सुद्धा ठरवून दिलेल्या निर्देशा प्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे .