ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन करण्याचे संकेत देणाºया ठाणे महापालिका प्रशासनाने आता शहरातील २२ ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडूनही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसलेली ही ठिकाणे प्रशासनाने जाहीर केली आहेत. आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.
अनलॉक सुरू झाल्यापासून ठाणे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने नौपाडा-कोपरी, वागळे, लोकमान्यनगर, सावरकर नगर, मुंब्रा आणि कळवा यांसारख्या भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनातर्फे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिरिक्त आयुक्त देशमुख यांनी सांगितले की, तीन महिन्यांत कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला योग्य साथ मिळाली नाही. त्यामुळे २२ ठिकाणी कडक लॉकडाऊनचा निर्णय कधीही होण्याची शक्यता असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. या लॉकडाऊनमध्ये बाळकूम, कोलशेत, ढोकाळी, मानपाडा, राममारु तीनगर, घोडबंदरचा काही भाग, कोपरी, नौपाडा, वागळे, किसननगर, पडवळनगर, शांतीनगर, वारलीपाडा, कैलासनगर, रामनगर, इंदिरानगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, कळवा, मुंब्रा आदी भागांचा समावेश राहण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनातर्फे २२ ठिकाणी कोणत्याही क्षणी लॉकडाऊ न जाहीर होण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू भरून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सोमवारी, मंगळवारी याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.