- स्नेहा पावसकरठाणे : आता या मिनी लॉकडाऊनमध्ये बाहेर बाजारपेठा, मॉल्स, दुकाने बंद आहेत; परंतु हल्ली सर्रास वस्तू ऑनलाइन घरी मागवल्या जातात. या वस्तू घरी पोहोच करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. वस्तू, पदार्थ घेऊन एखाद्या इमारत, चाळीत जायचे म्हटले, तर ठाण्यात अनेक सोसायट्या, इमारतींमध्ये बाहेरील व्यक्तींना पुन्हा प्रवेश बंद केलेला आहे, काही इमारती तर मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. मात्र, तरीही तेथील ग्राहकांचा आग्रह घरपोच सेवा देण्याचा असतो. बिल्डिंगचे सिक्युरिटीही रहिवाशांचे पार्सल सोडवून घेत नाहीत, अशा परिस्थितीत आम्ही काम करायचे कसे? आमच्या आरोग्याला धोका नाही का? किंवा आमच्यावर काही गुन्हा दाखल झाला, तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने पुन्हा लॉकडाऊन नाही; पण राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र, पार्सल, होम डिलिव्हरी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत अनेक लहान- मोठ्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर करणे सुरू आहे. वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असल्यामुळे आणि सध्या तर काेरोनाचे वातावरण असताना बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलॉइन खरेदीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अनेक कंपन्यांचे कर्मचारी होम डिलिव्हरीचे काम करतात. मात्र, सध्या ठाणे आणि परिसरात अनेक इमारतींमध्ये पुन्हा बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद केलेला आहे. सोसायटीच्या गेटवरच तसे फलक लिहिलेले आहेत. काही सोसायट्यांत रुग्ण सापडल्याने तो परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तसे फलक लावलेले दिसत आहेत. आता अशा सोसायट्यांत प्रवेश नसल्याने आणलेले पार्सल ग्राहकापर्यंत पोहोचवायचे कसे, हा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर आहे. ग्राहकाला गेटजवळ बोलावले तरी ते घरी पोहोचवा असेच सांगतात. लोकांच्या दारात जाणे म्हणजे आजाराला स्वत:हून भेट देण्यासारखे असून जिथे असे कंटेन्मेंट झोन आहे, तेथील रहिवाशांनी तरी सहकार्य करावे, असे डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.आम्ही होम डिलिव्हरीचे काम करतो. मात्र, मायक्रो कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरात जाणेही आरोग्यासाठी घातक आहे. इतर ठिकाणी, इतर वेळी आम्ही ग्राहकाच्या दरवाजापर्यंत सेवा देतो. मात्र, आता या परिस्थितीत ग्राहकांनीही समजून घेऊन सहकार्य करावे. -दिनेश राजुरेआम्ही पार्सल घरोघरी पोहोचवतो. आमचे लसीकरण करावे, असे शासनाने निर्देश केलेले आहेत. मात्र, याबाबत कंपनीही पुढाकार घेत नाही आणि लसीकरण झाले तरी ग्राहकांनी आपापल्या परिसराची कल्पना लक्षात घेऊन होम डिलिव्हरी करणाऱ्यांच्याही आरोग्याचा विचार करून तसे वर्तन करावे. -उमासिंग झिंगरू
CoronaVirus Lockdown News: अनेक इमारतींमध्ये प्रवेश बंद, तरी ग्राहकांना हवे घरपोच पार्सल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:00 AM