ठाणे : वाइन शॉप सुरू होणार या आशेने सोमवारी सकाळपासूनच तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली होती. ती वाढत गेल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांना हाकलवून लावले. शहरात सर्व ठिकाणी वाइन शॉप बंद होते असे पोलिसांनी सांगितले.वाइन शॉप सुरू होणार असल्याचे वृत्तवाहिन्यांद्वारे समजल्यानंतर रविवारपासून सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे तळीरामांनी मोठ्या आशेने सोमवार सकाळपासूनच दारूच्या दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. वृत्त वाहिन्यांवर सोमवारी वाइन शॉप उघडणार असे समजल्याने आम्ही येथे आलो, असे रांगेत उभे असणाऱ्या तळीरामांनी सांगितले. काही ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टन्स्गििं ठेवून ते रांगेत उभे होते. कोणी सकाळी ६ वाजता कोणी सात तर कोणी आठ वाजल्यापासून रांगेत उभे होते. ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे ठाणे हे रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. दोन्ही झोन असलेल्या भागांत अद्याप तरी वाइन शॉप उघडण्याची परवानगी नाही,असे असताना वाइन शॉप समोर लोकांच्या रांगा होत्या. परंतु, ती सुरू झाली नसल्याने तळीरामांचा गोंधळ उडाला अन् त्यांची निराशा झाली.उत्पादन शुल्कची परवानगी नाहीअंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूरमधील दारूची दुकाने उघडणार या आशेवर पहाटे ४ वाजल्यापासून काही नागरिकांनी दुकानाबाहेर गर्दी केली होती. मात्र सकाळी १० वाजता दुकाने उघडलीच नाहीत. दुकानदारांना राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी न मिळाल्याने ती दुकाने उघडता आली नाही. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागले. अंबरनाथ येथील स्टेशन परिसरात मोठी गर्दी झाली होती. निर्णय झाला असला तरी संबंधित विभागाचे लेखी आदेश न मिळाल्याने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला.सोशल डिस्टन्सिंगची उल्हासनगरला ऐशी-तैशीउल्हासनगर : परराज्यात जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अर्ज करण्यासाठी परप्रांतीय नागरिकांची रुग्णालय आणि पोलीस ठाण्यासमोर झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी झाल्याचे उल्हासनगरमध्ये सोमवारी पाहायला मिळाले. दुसरीकडे मद्यपींनीही दारूचे दुकान उघडण्यापूर्वीच रांगा लावल्या होत्या. उल्हासनगरात परप्रांतीय कामगारांची मध्यवर्ती रुग्णालयासह इतर रुग्णालयांबाहेर गर्दी केली होती. या गर्दीमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.कल्याणमध्ये दारूच्या दुकानांसमोर गर्दीदारूची दुकाने उघडणार या आशेने अनेक तळीरामांनी सोमवारी सकाळपासूनच शहरातील दारूच्या दुकानांबाहेर रांग लावली. मात्र, दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने न उघडल्याने त्यांच्या पदरी निराशाच आली. दरम्यान, त्यांनी लावलेल्या रांगांमुळे लॉकडाउनचे तीनतेरा उडाले.कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या १९५ च्या वर गेल्याने ही शहरे हॉटस्पॉट घोषित करण्यात आली आहेत. तर, अनेक भाग हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाले आहेत. रेड झोनमध्ये दारूची दुकाने उघडता येत नाहीत. असे असताना तळीरामांनी पश्चिमेतील खडकपाडा चौकात एका दुकानासमोर रांग लावली होती. हे दुकान कधी उघडणार याच्या प्रतीक्षेत ते होते.
एका तळीरामाने सांगितले की, दारूची दुकाने उघडण्यासाठी काय हरकत आहे. सध्या सरकारच्या तिजोरीत आता कोणतेही उत्पन्न जमा होत नाही. दारूची दुकाने उघडली तर त्यातून सरकारला महसूल मिळेल. ज्याच्या खिशात दाम आहे, तो दारू विकत घेईल.अन्य एकाने सांगितले की, किती दिवस घरात बसणार. मुंबईतील लोकांनी इतके दिवस धीर धरला असेल का, असा सवाल त्याने केला. दारूच्या शोधात अनेक लोक घराबाहेर पडत आहेत. दारू मिळाली तर लोक घराबाहेर पडणार नाहीत. लॉकडाउन अचानक जाहिर झाल्याने अनेकांच्या घरी स्टॉक नव्हता. सध्या काळात दुप्पट-तिप्पटपेक्षा जास्त भावाने दारू विकली जात आहे.