ठाणे - ठाणे जिल्ह्यात जुलै महिना उजाडताच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले. या वाढत्या संख्येला प्रतिबंध यावा, यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर आणि मीरा-भार्इंदर या प्रमुख महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागांतदेखील १० दिवसांची टाळेबंदी घेण्यात आली. तिचा सकारात्मक परिणाम म्हणून जुलै महिन्यात दोन हजारांच्या घरात पोहोचलेली बाधितांची संख्या पुन्हा एक हजाराच्या आसपास येऊन पोहोचली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर, दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर जून महिन्यात तीमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली. त्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. त्यावेळी ४०० ते एक हजारांच्या आत रुग्णसंख्या होती. मात्र, जुलै महिन्यात टाळेबंदी आणखी शिथिल केल्याने रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून आले.२ जुलै रोजी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होऊन एक हजाराच्या आसपास असलेली बाधितांची संख्या थेट एक हजार ९२१ वर पोहोचली. तर, ३ जुलै रोजी तीत वाढ होऊन तिने दोन हजार २७ चा उच्चांक गाठला. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर व महापालिका प्रशासनांवर चिंतेचे सावट निर्माण झाले. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येबाबत जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्तांशी चर्चा करून अटकाव आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देतानाच त्यांची झाडाझडतीदेखील घेतली. यानंतर मात्र जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रात काही ठिकाणी १ जुलैपासून, तर काही ठिकाणी २ जुलैपासून ते १२ जुलैपर्यंत टाळेबंदी लागू केली.या टाळेबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त अन्य एकही दुकान खुले ठेवण्यात येणार नसल्याचे फर्मान महापालिकांनी काढले आहे. त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळत आहे.कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या आटोक्यातकल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात जुलै महिना उजाडताच रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्य्याचे पाहायला मिळाले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या थेट ५०० ते ५६० पर्यंत गेली. मात्र, आता टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम होऊन आता ती २०० ते ३०० च्या आसपास येऊन पोहोचली आहे. इतर शहरांतही हा आलेख घटत आला आहे.
coronavirus: लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांमध्ये घट, सर्वच शहरांत सकारात्मक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 12:41 AM