कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत कायम असणार आहे. काही भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर काही भागांमध्ये वाईन शॉपदेखील सुरू करण्यात आले. वाईन शॉप सुरू होताच एक वेगळेच चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. वाईन शॉपच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळतेय. आनंदाच्या भरात 'झिंगाट' झालेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचेदेखील सारे नियम धाब्यावर बसवले आहेत.
अंबरनाथमध्ये अतिउत्साही लोकांनी वाईन शॉप बाहेर अशीच गर्दी केली आणि बघता -बघता ही गर्दी इतकी वाढली की, आटोक्यात येणं शक्य नव्हतं. त्यामुळे अवघ्या 20 मिनिटांत वाईन शॉप बंद करावे लागले. वाईनशॉप उघडण्या आधीच लोकांनी केलेली ही गर्दी पाहून पोलिसांनी अतिउत्साही नागरिकांना हाकलून लावले. अवघ्या २० मि. घडलेला हा प्रकार पाहून वाईन शॉप तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
तर दुसरीकडे मुंबईतील माटुंग्यामध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे तेथे देखील पोलिसांनी वाईन शॉप उघडू दिले नाहीत. वाईन शॉप सुरू केल्यामुळे पोलिसांवर ताण आणखी वाढला आहे. इतर ठिकाणांची गर्दी आटोक्यात आणता आणता पोलिसांच्याही नाकी नऊ आले असताना आता दारूसाठी उतावीळ झालेल्यांवर देखील पोलिसांना नजर ठेवावी लागणार आहे.