ठाणे: जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 195 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने रुग्ण संख्या ही दोन हजार 903 इतकी झाली आहे. तसेच आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा 87 वर पोहोचला आहे. गुरुवारी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून ठामपाने नऊशेचा आकडा पार केला आहे. तर नवीमुंबईत ही 64 रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी एक रुग्ण हा भिवंडीत आढळून आल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात ठामपा हद्दीत सर्वाधिक 70 नवीन रुग्णांची नोंदणी झाली असून येथील रुग्ण संख्या 913 इतकी झाली आहे. तसेच ठामपात पाच जण दगावल्याची नोंद झाली असून येथील मृतांचा आकडा 42 झाला आहे. त्यापाठोपाठ नवीमुंबईत 64 नवे रुग्ण आढळून आले असून तेथील रुग्ण संख्या 974 वर पोहोचली आहे. तर मिराभाईंदरमध्ये 21 नव्या रुग्णांमुळे रुग्ण संख्या 286 झाली आहे. उल्हासनगर येथे 11 नवे रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या 79 झाली असून त्यातच एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 4 वर गेला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ही 9 नवे रुग्ण निदान झाल्याने रुग्ण संख्या 129 इतकी झाली आहे.
बदलापूरात नवीन 7 रुग्ण मिळून अाल्याने रुग्ण संख्या 75 वर गेली आहे. कल्याण- डोंबिवलीत सापडलेल्या 6 नवीन रुग्णांमुळे तेथील रुग्णांचा आकडा 391 झाली आहे. त्याचबरोबर एकाचा मृत्यू झाल्याने मृत संख्या ही 8 वर गेली आहे. अंबरनाथमध्ये 6 नवीण रुग्ण मिळून आल्याने रुग्ण संख्या ही 23 झाली आहे. तर एकच नोंदवलेल्या नव्या रुग्णाने भिवंडीतील रुग्णांचा आकडा 33 झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.