ठाणे : कोरोनामुळे मास्कची मागणी वाढली असली, तरी शहरातील मेडिकलमध्ये ते मिळत नसल्याचे दिसत आहे. मेडिकलमध्ये मास्क नाही; पण रस्त्यावर सर्रास विकले जात असल्याची परिस्थिती शहरात आहे. बिलाची अडचण असल्याने मेडिकलमध्ये त्यांची विक्री बंद झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही अडचण दूर केली तर मेडिकलमध्ये ठाणेकरांसाठी मास्क मिळतील, असे केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सांगितले.मास्कची रस्त्यावर सर्रास विक्री सुरू आहे. कुठे दहा रुपये, कुठे ५० रुपये, कुठे १०० रुपयाला ते विकत मिळत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलमध्ये मास्कची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर ते विकण्यासाठी बिल असणे आवश्यक आहे. उत्पादन कंपनीकडून मास्क घेताना खरेदीचे आणि ग्राहकांना मास्क विकताना अशी दोन्ही बिले असणे आवश्यक असल्याची अट घातल्यामुळे मेडिकलमध्ये ते मिळत नसल्याचे औषधविक्रेत्यांनी सांगितले. रस्त्यावर मास्क विनाअट विकले जातात आणि मेडिकलमध्ये ते नाहीत, अशी परिस्थिती असल्याची खंत औषधविक्रेत्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. असंघटित क्षेत्रामध्ये मास्क बनविले जात आहेत, त्यांच्याकडे बिल नाही त्यामुळे आम्हाला ते मिळत नाहीत आणि केवळ याच कारणामुळे ते मेडिकलमध्ये विकले जात नाहीत. मागणी खूप असली तरी ८० टक्के मेडिकलमध्ये ते मिळत नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष संजय धनावडे यांनी सांगितले. पुढच्या महिन्यापासून बिलाची तरतूद केली जाईल; पण आता मागणी असल्याने ही अडचण एफडीएने दूर करावी, अशी मागणी धनावडे यांनी केली.१२ हजार मास्कची आवक थांबलीकिमान १२ हजार मास्क दररोज ठाण्यात येत होते; परंतु बुधवारपासून मास्क ठाण्यात येणे बंद झाले आहेत. आज जे उपलब्ध आहेत तेच विकले जात असल्याचे एका विक्रेत्याने (नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगितले.ठाण्यामध्ये आले फॅशनेबल मास्कठाणे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन केल्यानंतर बाजारात विविध प्रकारचे मास्क दिसू लागले आहेत. यात फॅशनेबल मास्कही दिसत असून हेल्मेट मास्क, फिल्टर मास्क अशी विविध मास्कना मागणी आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे सावट आल्यानंतर सॅनिटायझर आणि मास्कच्या मागणीत वाढ होऊ लागली. नेहमी पाहायला मिळणाऱ्या मास्कव्यतिरिक्त विविध आकार आणि प्रकारांचे मास्क मिळू लागले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यामध्येही विविध फॅशन आणली आहे. अगदी १० रुपयांपासून ते मिळत आहेत. ठाण्याच्या बाजारपेठेत मास्कची जागोजागी विक्री होताना दिसत आहे. नेट मास्क, हॅलोविन मास्क, प्रिंटेड मास्क, एक दिवसासाठी वापरला जाणारा मास्क, कोन मास्क तर वाहनचालकांसाठी हाफ बाइकर्स मास्क आणि हेल्मेट मास्क, लहान मुलांसाठी रंगीबेरंगी बॉर्डर असणारे मास्क बाजारात आहेत. कॉटन व होजिअरी कॉटन यामध्ये ते उपलब्ध असून खरेदीदारांमध्ये पुरुषांची संख्या अधिक असल्याचे विक्रेते अजय प्रजापती यांनी लोकमतला सांगितले.रंगीबेरंगी मास्क उपलब्धहिरव्या आणि सफेद रंगांतील मास्क प्रामुख्याने पाहायला मिळत होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कला वाढलेली मागणी पाहता या मास्कमध्ये काळा, पिवळा, खाकी, राखाडी, गडद राखी, निळा, नेव्ही ब्ल्यू, गडद निळा, चॉक्लेटी असे रंगही पाहायला मिळत आहेत.
Coronavirus : मेडिकलमध्ये मास्क उपलब्ध नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 2:21 AM